नामदेव मोरेलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाला लागून असलेल्या डोंगरावरील या गावाला वर्षानुवर्षे समस्यांचा विळखा पडला होता. गावात जाण्यासाठी रस्ता नाही. वीज नाही, सौरऊर्जेच्या अपुऱ्या प्रकाशात कसेबसे जगावे लागत आहे. प्राथमिक शिक्षणाचीही सोय नसल्यामुळे पहिलीपासून मुलांना आश्रमशाळेचा आधार घ्यावा लागतो. महत्त्वाचे पर्यटनस्थळ असूनही येथील समस्यांकडे कायम दुर्लक्ष झाले आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर चौकजवळ मोरबे धरणाला लागून असलेला इर्शाळगड सर्वांचे लक्ष वेधून घेतो. घाटमाथ्यावरून कोकणात येणाऱ्या व्यापारी मार्गाची टेहळणी करण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. गडाच्या कुशीत जवळपास ४८ कुटुंबांचे व २२८ लोकसंख्या असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. घरेदारे गेली. पनवेलपासून जवळच असलेले हे आदिवासी गाव स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही समस्यांशी झुंज देत आहे. गावात जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही. ठाकूरवाडीत वाहने उभी करून पायवाटेने डोंगर चढून गावात जावे लागते. किराणापासून बांधकाम साहित्यही दोन तास डोंगर चढून वर घेऊन जावे लागते. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता असावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे केली; परंतु, त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही.
एखादी व्यक्ती आजारी पडली, तर त्यांना डोलीत बसवून खाली आणावे लागायचे. गावात वीजपुरवठाही नव्हता. ग्रामपंचायतीने सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याचा प्रयत्न केला; परंतु, सौरदिव्याचा प्रकाश पुरेसा नव्हता. पावसाळ्यात सौरदिवे बंद राहायचे. सौरदिव्यांच्या बॅटऱ्याही अनेक वेळा नादुरुस्त व्हायच्या. रस्ता, वीज नसल्यामुळे गावात आरोग्य व इतर सुविधाही मिळत नव्हत्या.
‘लोकमत’चा पाठपुरावाइर्शाळवाडीतील समस्यांवर ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठविला होता. गावात रस्ता, वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा मिळाव्या, यासाठी वेळोवेळी तेथील प्रश्न मांडले. गैरसोयींवरही प्रकाश टाकला होता.
ऐतिहासिक महत्त्वसरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव असलेल्या चौक गावाच्या समोरच इर्शाळगड उभा आहे. विर्वाच्या आकाराचा गडाचा कडा मुंबई-पुणे महामार्गावर जाताना लक्ष वेधून घ्यायचा. व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. गडावर बांधकामे नाहीत. पण गडाचा सुळका राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. गडावरून प्रबळगड, माणिकगड, कर्नाळा, माथेरान असा परिसर दिसत असल्यामुळे पर्यटक वर्षभर इर्शाळगड पाहण्यासाठी यायचे. गडावरून मोरबे धरणाचा परिसरही पाहावयास मिळतो.