नवी मुंबई : राज्यात सर्वत्र टोमॅटोचे उत्पादन कमी झाले आहे. आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो १२ ते ३५ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये दराने विकला जात आहे. राज्यातील इतर बाजारसमितीमध्येही दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. समितीमध्ये बुधवारी १७० टन टोमॅटोची आवक झाली आहे. एक महिन्यापुर्वी बाजार समितीमध्ये टोमॅटोला ८ ते १४ रुपये दर मिळत होता. दहा दिवसापूर्वी १४ ते २४ रुपये किलोने विक्री होत होती.बुधवारी हेच दर १२ ते ३५ रुपये किलोवर पोहचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये दराने टोमॅटोची विक्री होत आहे. सद्यस्थितीमध्ये नाशिक परिसरातून आवक जास्त होत आहे. सातारा, सोलापूर, पुणे परिसरातील आवक कमी झाली आहे. राज्यात सर्वच बाजार समितीमध्ये आवक कमी झाली होत आहे. बाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की दहा दिवसांपासून आवक कमी झाली असून त्यामुळे दर वाढत आहेत.
राज्यातील प्रमुख बाजारसमितीमधील टोमॅटोचे होलसेल दर
- पुणे - १८ ते ४०
- मुंबई १२ ते ३५
- कोल्हापूर १० ते ३०
- छत्रपती संभाजीनगर १२ ते ३०
- कल्याण ३४ ते ४०
- सोलापूर ३ ते २५
- नागपूर १५ ते २५