अग्नितांडव... नवी मुंबईत भीषण आग, ६ कारखाने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 01:45 AM2022-05-07T01:45:25+5:302022-05-07T01:45:52+5:30

खैरणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सहा कारखाने जळून खाक झाले.

A huge fire in Navi Mumbai 6 factories burnt down friday afternoon | अग्नितांडव... नवी मुंबईत भीषण आग, ६ कारखाने जळून खाक

अग्नितांडव... नवी मुंबईत भीषण आग, ६ कारखाने जळून खाक

googlenewsNext

नवी मुंबई : खैरणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सहा कारखाने जळून खाक झाले. दुर्घटनेत तीनजण जखमी झाले असून, छतावर तिघे अडकून दगावल्याची भीती व्यक्त होत आहे. एमआयडीसीमध्ये दोन दिवसांचा शटडाऊन असल्याने पाण्याचा तुटवडा भासला. त्यामुळे आग विझविण्यास उशीर झाला. अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब आणि महापालिका, सिडकोच्या १५ ते २० पाण्याच्या टँकरद्वारे रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीचे कारण समजू शकलेले नाही.  

आग लागल्यानंतर झालेल्या छोट्या-मोठ्या स्फोटांमुळे लगतच्या इतरही कारखान्यांना धोका निर्माण झाला होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खैरणे एमआयडीसीमधील वेस्ट कॉस्ट पॉलिकेम या कारखान्यास आग लागली. काही क्षणातच आग शेजारच्या नागनिवेश, हिंद या कारखान्यांसह डेरी व इतर तीन कारखान्यांमध्ये पसरली. नागनिवेश कारखान्यात मोठ्या प्रमाणात असलेला बदामाचा साठा व वेस्ट कॉस्टमधील रबराने पेट घेतल्याने आगीचा भडका उडत होता. रबराच्या कारखान्यातून धुराचे मोठमोठे लोट निघत होते. या दरम्यान वेस्ट कॉस्ट कंपनीच्या छतावर तीन कामगार अडकल्याचे नजरेस पडले. सर्वत्र धूर पसरल्याने नंतर त्यांच्याबाबत कोणालाही माहिती मिळाली नाही. दुर्घटनेत १५ ते २० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

आग लागल्यानंतर तीन जखमी कामगारांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. आग शेजारच्या कारखान्यांमध्ये पसरू नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. यासाठी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या मदतीला महापालिका व सिडकोचे अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले होते. 

वेळेवर पाणी मिळाले नाही, जबाबदार कोण?
आग विझविण्याचे काम सुरू असताना पाण्याची गरज भासत होती. परंतु, एमआयडीसीमध्ये दोन दिवसांचा शटडाऊन असल्याने पाण्याचा तुटवडा भासत होता. अखेर घटनास्थळी उपस्थित माजी महापौर यांनी पालिका आयुक्तांशी संवाद साधून इतर ठिकाणी टँकरद्वारे पुरविले जाणारे पाणी घटनास्थळी मागवून घेतले. एखाद्या मोठ्या आगीच्या दुर्घटनेत ती विझवण्यासाठी जाणवणाऱ्या उणिवा नवी मुंबईसारख्या प्रगत महापालिका आणि एमआयडीसीत शुक्रवारी आढळून आल्या.

एनडीआरएफची मदत मिळविण्याचा प्रयत्न
कारखान्याच्या छतावर तीन कामगार अडकल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित सहायक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी एनडीआरएफला संपर्क साधून मदत मिळू शकते का, याबाबत चौकशी केली. परंतु, आगीची घटना असल्याने हेलिकॉप्टर अथवा इतर प्रकारे मदत पुरविणे कठीण असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

सुरुवातीला फक्त करावा लागला पाण्याचा मारा
फोम घेऊन वाहने लवकरच यावीत, यासाठी ओएनजीसीपासून दुर्घटनास्थळापर्यंत पोलिसांनी खास ग्रीन कॉरिडॉर केला होता. आग लागलेल्या एका कारखान्यात बदामाचा साठा, दुसऱ्या कारखान्यात रबरचे साहित्य असल्याने पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नव्हती. परंतु, सुरुवातीला फोमचा पुरेसा पुरवठा न होऊ शकल्याने केवळ पाण्याचा मारा करूनच आग विझविण्याची कसरत अग्निशमन दलाला करावी लागली.

जखमींवर रुग्णालयात उपचार
प्रिया पटेल (३०), पद्मनी तलाठे (३६) या दोन महिलांसह तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघींची प्रकृती ठिक असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Web Title: A huge fire in Navi Mumbai 6 factories burnt down friday afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.