६.५ किलोच्या भेकराला अजगराने गिळले; निसर्ग मित्रांनी मुक्त वातावरणात सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:12 PM2023-09-12T20:12:44+5:302023-09-12T20:16:21+5:30
निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी अजगराची सुटका करून त्याला नैसर्गिक मुक्त वातावरणात सोडले.
मधुकर ठाकूर
उरण : उरण -पनवेलच्या बार्डरवर खानशेत-तारगाव दरम्यान असलेल्या एका खासगी फार्महाऊसच्या शेजारी साडेनऊ फुट लांबीच्या अजगराने साडेसहा किलो वजनाच्या भेकराला गिळले. भेकराला गिळून निपचिप पडलेल्या अजगराची आदिवासींकडून हत्या होण्याची शक्यता होती .मात्र वेळीच पोहचलेल्या चिरनेर येथील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी अजगराची सुटका करून त्याला नैसर्गिक मुक्त वातावरणात सोडले.
मंगळवारी (१२) पहाटेच्या सुमारास उरण -पनवेलच्या बार्डरवर आदिवासी वस्तीत असलेल्या एका खासगी फार्महाऊसच्या शेजारी एक अजगर पोट फुगलेल्या अवस्थेत निपचिप पडून असलेल्या अवस्थेत केअरटेकरला दिसून आला.अजगराने आदिवासींच्या बकऱ्या फस्त करणाऱ्या अजगराला मारुन टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी घेत केअरटेकर रोशन घरत,मनिष मोरे यांनी लागलीच सर्पमित्रांना पाचारण केले.माहीती मिळताच चिरनेर येथील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य सुयोग गावडे यांनी फार्महाऊसकडे धाव घेतली. सर्पमित्रांनी पोट फुगलेल्या आणि निपचिप पडलेल्या अजगराची पाहणी केली .त्यांना एका साडेनऊ फुट लांबीच्या इंडियन पायथॉन जातीच्या अजगराने काही तरी मोठे भक्ष्य गिळले असल्याचे दिसून आले. सर्पमित्रांनी निपचिप पडलेल्या अजगराला हालचाल करण्यास भाग पाडल्यानंतर गिळलेले भक्ष्य त्याने उगळून बाहेर काढले.बाहेर पडलेल्या भक्ष्याच्या पाहणीत साडेसहा किलो वजनाचे मृत भेकर असल्याचे निदर्शनास आले.सर्पमित्रांनी वन विभागाचे कर्मचारी सचिन मोरे यांना अजगराची माहिती दिली.वनरक्षक सचिन मोरे यांच्या मदतीने सर्पमित्रांनी अजगराला नैसर्गिक आवासात सोडून दिले.