भाचीवर केला बलात्कार, नराधम मामास अटक; पनवेलमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 07:48 AM2023-03-31T07:48:05+5:302023-03-31T07:48:22+5:30
पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.
नवीन पनवेल : मावस बहिणीच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपी झारखंडमधील मामाच्या विरोधात पोक्सोंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपीने पीडित मुलीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे ती गरोदर राहिली. तिची तब्येत खराब झाल्याने आईने तिला उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये नेल्यावर ती गरोदर असल्याचे समजले. त्यांनतर पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.
पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी हुलगे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलिस हवालदार परेश म्हात्रे व पोलिस शिपाई प्रसाद घरत यांना गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाद्वारे आरोपी हा मुंबई येथील गोरेगाव या ठिकाणी नोकरीवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला नोकरीच्या ठिकाणावरून अटक केली आहे. दरम्यान, परिसरातून प्रचंड संताप व्यक्त होत असून आरोपींना कडक शिक्षेची मागणी होत आहे.