उरण शहरातील अनधिकृत भंगार गोदामाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 06:40 PM2023-10-27T18:40:15+5:302023-10-27T18:40:33+5:30

मधुकर ठाकूर उरण :   उरण नगरपरिषद हद्दीतील उरण-मोरा रस्त्यालगत असलेल्या बोरी येथील एका अनधिकृत भंगार गोदामाला शुक्रवारी (२७) ...

A massive fire broke out at an unauthorized scrap warehouse in Uran city | उरण शहरातील अनधिकृत भंगार गोदामाला भीषण आग

उरण शहरातील अनधिकृत भंगार गोदामाला भीषण आग

मधुकर ठाकूर

उरण :  उरण नगरपरिषद हद्दीतील उरण-मोरा रस्त्यालगत असलेल्या बोरी येथील एका अनधिकृत भंगार गोदामाला शुक्रवारी (२७)  भीषण आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी या गोदामाच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींचे आणि झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.सिडको, जेएनपीटी, ओएनजीसी, एनएडी,जीटीपीएसच्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे टँकर ही आग विझविण्याचा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

उरण शहरात बोरी –पाखाडी हद्दीत भंगाराची अनेक अनधिकृत गोदामे आहेत.विविध शासकीय विभागांच्या जागेवर अतिक्रमण करून नगरपरिषद आणि पोलिसांच्या आशिर्वादाने ही भंगाराची दुकाने सुरू आहेत. हे भंगाराचे गोदामही रमझान नामक एका परप्रांतियाने थाटले होते. प्लास्टिक, लाकडाचे पॅलेट, प्लायवूड, केबल,रासायनिक केमिकलचे ड्रम, लोखंड आणि ज्वालाग्राही पदार्थांनी गोदाम भरलेले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथे जवळच असलेल्या ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्ट-सर्किट झाल्याने आग लागली. गोदामात ज्वलनशिल वस्तू आणि रसायने असल्यामुळे या आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले. आगीचे स्वरूप पाहिल्यानंतर शेजारील इमारतीतील अनेक कुटूंबांना इमारतीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.आजुबाजुच्या इमारतींमधील गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले. वीज पुरवठाही बंद करण्यात आला. आगीची तीव्रता इतकी होती की बाजूला असलेल्या इमारतींची तावदाने, पाण्याच्या टाक्याही फुटल्या.

आगीचे गांभिर्य ओळखून आमदार महेश बालदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आग विझविण्यासाठी आणि नागरीकांना मदत करण्यासाठी सहकार्य केले. या आगीमुळे जीवीत हानी झाली नसली तरी शहरातील अनधिकृत भंगार दुकांनांचा आणि गोदांमाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद हद्दीत रस्त्याच्या कडेला आणि शासकीय जागांवर अनेक भंगारांची दुकाने थाटली आहेत. स्थानिक प्रशासनच याला कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी जमलेल्या नागरीकांनी व्यक्त केल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळावर धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र उरण शहरातील अरुंद रस्ते, बेशिस्त वाहतूक कोंडी यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना काही ठिकाणी अडथळ्यांचा सामना करावा लागला. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने धुराचे लोट उंच उंच आकाशाला भिडले होते.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहाणी झाली नाही.मात्र विविध शासकीय विभागांच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या अशा भंगार व्यवसायामुळे रहिवाशांच्या सुरक्षेला प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग आटोक्यात आली आहे. गोदाम अधिकृत आहे किंवा अनधिकृत याची चौकशी केली जाईल.नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्यांवर सर्वच भंगाराच्या अनधिकृत गोदामांची कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उरण तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिला आहे.

Web Title: A massive fire broke out at an unauthorized scrap warehouse in Uran city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.