नवी मुंबई: कोपरखैरणे येथील सेक्टर 17 मधील निलकंठ इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर सात मजल्याच्या इमारतीतील सर्व रहिवाशांनी रस्त्यावर धाव घेतली.
अग्निशमन दलाला संपर्क साधल्यानंतर जवळपास पाऊण तासाने अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल. परंतु दाखल झालेल्या गाडीच्या मर्यादा पाचव्या मजल्यापर्यंत पोचण्या इतपत नसल्याने त्यास क्षमतेचा अग्निशमन बंब मागविण्यात आला. त्यासाठी आणखी अर्धा ते पाऊण तासांचा वेळ गेल्याने तोपर्यंत दुर्घटनाग्रस्त फ्लॅट जळून खाक झाला.
या संदर्भात महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख शिरीष अरदवाड यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान या दुर्घटनेत संपूर्ण फ्लॅट व आतील साहित्य जळून खाक झाले असल्याचे अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र नुकसानीचा इतर तपशील समजू शकला नाही. रात्री दोन वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.