माथाडी कृती समितीबरोबर बैठक आयोजीत करावी; नरेंद्र पाटील यांची मागणी
By नामदेव मोरे | Published: December 8, 2023 02:50 PM2023-12-08T14:50:08+5:302023-12-08T14:50:27+5:30
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
नवी मुंबई : माथाडी कायदा बचाव समितीच्या माध्यमातून १४ डिसेंबरला राज्यव्यापी बंदचे आयोजन केले आहे. शासनाने समितीच्या मागण्यांची दखल घ्यावी व त्वरीत बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केले असून याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
शासनाने माथाडी कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक तयार केले आहे. सुधारणांच्या नावाखाली देशातील एकमेव माथाडी कायदा निष्प्रभ करण्याचा डाव असल्याचे मत प्रमुख माथाडी संघटनांनी व्यक्त केले आहे. माथाडी कायदा वाचविण्यासाठी व संघटनांचे म्हणने शासनाकडे पोहचविण्यासाठी सर्व संघटनांनी १४ डिसेंबरला एक दिवसाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या जाणार आहेत. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे. शासनाने माथाडी कायदा बचाव कृती समितीची तत्काळ बैठक आयोजीत करावी. संघटनांच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणीही केली आहे.