सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई : डेटिंग ऍपद्वारे महिलेशी झालेली ओळख एका व्यक्तीला सव्वा कोटीला पडली आहे. महिलेने सदर व्यक्तीसोबत ओळख वाढवून फॉरेक्स ट्रेडिंगचा माध्यमातून नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने हि रक्कम हडपली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
खारघर परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. एका नामांकित कंपनीत ते उच्च पदावर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये डेटिंग ऍप्लिकेशन घेतले होते. त्यावर एका महिलेसोबत त्यांची ओळख झाली होती. या महिलेने त्यांच्यासोबत ओळख वाढवून आर्थिक गुंतवणुकीबद्दल चौकशी केली होती. त्यामध्ये सदर व्यक्तीने फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून महिलेच्या नावे त्यांच्यासोबत चॅटिंग करणाऱ्याने त्यांना दोन ऍप्लिकेशन पाठवले होते. त्यावर तक्रारदार यांनी सुरवातीला पाच लाख रुपये भरले होते.
काही दिवसातच या गुंतवणुकीतून त्यांना मोठा नफा झाल्याचे ऍप्लिकेशन मधील आलेखात दिसून आले. यामुळे त्यांनी टप्प्या टप्प्याने एकूण १ कोटी २२ लाख रुपये भरले होते. यातून त्यांना अडीच कोटींचा नफा झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे सदर रक्कम त्यांनी काढून घेण्याची इच्छा व्यक्त केली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या शुल्कच्या नावाखाली लाखो रुपयांची मागणी होऊ लागली. अखेर सव्वा कोटी रुपयांना फसल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यामळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.