निष्ठावंत राजकीय कारकीर्द असलेले व्यक्तिमत्त्व
By नारायण जाधव | Published: February 17, 2024 07:04 PM2024-02-17T19:04:56+5:302024-02-17T19:05:05+5:30
स्वर्गीय डी. आर. पाटील यांच्या आठवणींना मान्यवरांनी दिला उजाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सध्या राजकिय स्वार्थासाठी अनेक पदे उपभोगून आपला मूळ पक्ष फोडण्याचे सत्र सुरू असताना त्याकाळात अनेक मोठ्यापदांची ऑफर येऊन आपला धर्मनिरपेक्ष बाणा कायम ठेवून डी. आर. पाटील यांनी शरद पवारांसोबत निष्ठा कायम ठेवली. राजकारणाच्या पलीकडील मैत्रीचे संबंध टिकवणारे कुशल प्रशासक, अभ्यासू नेता, निष्ठावंत राजकीय कारकीर्द असलेले ते नेते होते, अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय डी. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते स्वर्गीय ज्ञानेश्वर रामदास (डी. आर.) पाटील यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्र परिवार तसेच डी. आर. पाटील यांच्यासोबत आणि नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कामगार, पत्रकारिता आदी क्षेत्रात काम केलेल्या मंडळींनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिप्रेम आणि स्नेह कसा जपला पाहिजे याचे मूर्तिमंत दाहरण म्हणजे डी. आर. पाटील असल्याचे यावेळी नमूद केले.
‘नवी मुंबई'चे माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, राजू शिंदे, ‘एपीएमसी'चे संचालक अशोक वाळुंज, अरविंद नाईक, रवींद्र नाईक, वसंत भडकमकर, वसंत अहिरे, तानाजी पाटील, यशंवत पाटील, बाबासाहेब गायकवाड या मान्यवरांसह स्व. डी. आर. पाटील यांचे कुटुंबीय आणि तुर्भे ग्रामस्थ उपस्थित होते.
डी. आर. पाटील यांनी तुर्भे गाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती यासह विविध समिती सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषवली. वाढीव मालमत्ताकराविरोधात त्यांनी दिलेल्या लढ्याला यावेळी अनेकांनी उजाळा दिला.
‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट-जनरल कामगार युनियन'चे सरचिटणीस, रिक्षा युनियन आणि कामगार युनियन क्षेत्रातील स्वर्गीय डी. आर. पाटील यांच्या कार्यालादेखील यावेळी मान्यवरांनी उजाळा दिला.
दरम्यान, तुर्भे गावातील डॉ. सी. व्ही. सामंत विद्यालय संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी १२ वर्षे सांभाळले. स्व. डी. आर. पाटील आणि स्वर्गीय भोलानाथ पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य आता त्यांचे लहान बंधू चंद्रकांत पाटील, पत्नी बेबीताई पाटील, मुलगी शुभांगी पाटील, मुलगा विवेक पाटील, भावजय शशिकला पाटील यांच्यासह संपूर्ण पाटील कुटुंब पुढे नेत असल्याच्या भावना उपस्थितांना व्यक्त केल्या.