पनवेलचा एक प्लॅटफॉर्म तोडणार, प्रवाशांचे ‘मेगाहाल’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 08:32 AM2023-10-04T08:32:56+5:302023-10-04T08:38:17+5:30
हार्बर मार्गावर पनवेल ते बेलापूरदरम्यान ४३ तासांच्या मेगाब्लॉकनंतर कोलमडलेले वेळापत्रक चार दिवसांनंतरही पूर्वपदावर आलेले नाही.
पनवेल : हार्बर मार्गावर पनवेल ते बेलापूरदरम्यान ४३ तासांच्या मेगाब्लॉकनंतर कोलमडलेले वेळापत्रक चार दिवसांनंतरही पूर्वपदावर आलेले नाही. शुक्रवारपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याने तोवर रेल्वे वाहतुकीला फटका बसेल, अशी चिन्हे आहे. त्यातच मंगळवारी सकाळी पॉइंट फेल्युअर झाल्याने सकाळी लोकल वाहतुकीला फटका बसला. गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिरा धावत होत्या. सकाळच्या वेळेत पॉइंट फेल्युअरमुळे लोकल बंद पडल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळात उतरून पायपीट करत पुढचे स्थानक गाठले. सीएसएमटी, बेलापूर, वाशी, गोरेगाव आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. कामे झालेल्या काही भागात वेगमर्यादा कायम असल्याने त्याचा फटकाही रेल्वे वाहतुकीला बसतो आहे.
प्लॅटफॉर्मची कामे वेगात
पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चार कायमस्वरूपी तोडला जाणार आहे.
सध्याच्या प्लॅटफॉर्म एकचा नंबर तीन आणि तीनचा नंबर एक होईल. ही रचना बदलल्याने प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडत आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाजूला मालवाहतुकीसाठी दोन प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे.