मृत्यूच्या दारातून परत आलेल्या ८४ जणांचे मतदान
By नामदेव मोरे | Published: May 13, 2024 08:15 PM2024-05-13T20:15:53+5:302024-05-13T20:16:06+5:30
सील आश्रमातील रुग्णांमध्ये उत्साह : लोकशाहीच्या उत्सवामध्ये घेतला सहभाग : प्रशासनाचे मानले आभार
नवी मुंबई : दुर्धर आजार व मानसीक स्वास्थ्य हरवल्यामुळे रोडवर भटकत असलेल्या रुग्णांचे पुनर्वसन करण्याचे काम पनवेलमधील सील आश्रमाच्यावतीने केले जाते. अनेकांची मृत्यूच्या दारातून सुटका करण्यात आली आहे. या नागरिकांपैकी ८४ जणांनी मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रशासनाचे सर्वांनी आभार मानले आहेत.
पनवेल तालुक्यातील वांगणी येथे सील आश्रम मनोरुग्णांवरील उपचार व पुनर्वसनासाठीचे काम करत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रेल्वे स्टेशन, बस स्टँडसह रोडवर फिरणारे मनोरुग्ण, अजारी रुग्णांना आश्रमात आणून त्यांच्यावर उपचार केले जातात. आतापर्यंत शेकडो नागरिकांना त्यांच्या कुटुूंबियांशी भेट घडवून आणली आहे. ज्यांच्या कुटुंबियांचा शोध लागत नाही त्यांचा मृत्यूपर्यंत आश्रमात सांभाळ केला जातो. सद्यस्थितीमध्ये आश्रमात २७५ जणांचा सांभाळ केला जात आहे. रायगडच्या जिल्हाअधिकारी पदावर निधी चौधरी तहसीलदार पदावर विजय तळेकर असताना त्यांनी आश्रमातील नागरिकांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य केले होते. लोकसभा निवडणुकीसाठी ८९ नागरिकांचे मतदार यादीमध्ये नाव आले होते.
मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सील आश्रमातील ८४ जणांनी दिवसभरात मतदान केले. जिल्हा परिषद शाळा वांगणीमध्ये हे मतदान करण्यात आले. यामधील अनेकांची मृत्यूच्या दारातून सुटका झालेली आहे. गंभीर अजार, हरवलेले मानसीक स्वास्थ्य यामधून बाहेर पडून या सर्वांनी लोकशाहीच्या उत्साहात सहभाग घेतला. मतदानाचे कर्तव्य बजावता आल्याबद्दल या नागरिकांनी आश्रमाचे संस्थापक के एम फिलीप, बिजू सॅम्युअल यांच्यासह प्रशासनाचे आभार मानले आहेत.
मरण्यासाठी सोडले होते
सील आश्रमातील मतदान करणाऱ्या ८४ पैकी अनेकांना मरण्यासाठी सोडण्यात आले होते. शरिरामधील जखमांमध्ये किडे झाले होते. अनेक गंभीर अजार झाले होते. नाव व स्वत:विषयी काहीही आठवत नसलेल्या या सर्वांना आश्रमात आणून त्यांच्यावर योग्य उपचार केले. या सर्वांचे आरोग्य आता सुधारले असून यापैकी अनेकांनी पहिल्यांदाच मतदानाच हक्क बजावला. मतदान करता आल्याबद्दल आनंदही अनेकांनी व्यक्त केला.