ट्रेडिंगच्या बहाण्याने सव्वा कोटींचा गंडा; नफा मिळवण्यासाठी झाली अधिक पैशाची मागणी
By सूर्यकांत वाघमारे | Published: November 2, 2023 06:37 PM2023-11-02T18:37:36+5:302023-11-02T18:37:39+5:30
यावेळी त्यांनी तक्रारदार यांना विश्वासात घेऊन ट्रेडिंगमध्ये मोठा फायदा असल्याचे सांगून ऑनलाईन ट्रेनींग देखील दिले.
नवी मुंबई : ट्रेडिंगचा बहाण्याने १ कोटी ३७ लाखाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूक केलेल्या रकमेवर ४ कोटींचा फायदा झाल्याचे सांगून नफ्याची रक्कम काढून घेण्यासाठी त्यांच्याकडे अधिक ५० लाखाची मागणी केली जात होती.
वाशीत राहणाऱ्या ५७ वर्षीय व्यवसायिकासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांना बँकेचे अधिकृत कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या अजिंक्य भवर, आर्यन गुप्ता या व्यक्तींनी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी तक्रारदार यांना विश्वासात घेऊन ट्रेडिंगमध्ये मोठा फायदा असल्याचे सांगून ऑनलाईन ट्रेनींग देखील दिले. त्यानंतर मोठ्या गुंतवणुकीसाठी सब इन्सिट्यूशनल अकाउंट उघडण्यासाठी त्यांना मदत करून त्यामध्ये १ कोटी ३७ लाखाची रक्कम गुंतवण्यात आली. या रकमेतून त्यांना ४ कोटीहून अधिक रकमेचा नफा झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु हि रक्कम मिळवण्यासाठी त्यांना ५० लाख रुपये टॅक्स भरावा लागेल असे सांगण्यात आले. परंतु तेवढे पैसे नसल्याचे तक्रारदार यांनी सांगताच त्यांना सवलत देत सात लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. अखेर तक्रारदार यांना तब्बल सव्वा कोटी गुंतवल्यानंतर ७ लाखावरून संशय आल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली असता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानुसार पाच जणांवर सायबर पोलिस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.