Navi Mumbai Rain ( Marathi News ) : राजधानी मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचल्याने आज सकाळी मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर लोकल सेवा हळूहळू पूर्ववत झाली. मात्र अशातच नवी मुंबईत एक भयंकर अपघात घडला असून लोकल ट्रेनखाली येऊन एका महिलेला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल स्थानकावरून ठाण्याकडे जाणारी ट्रेन बेलापूर सीबीडी स्थानकावर येताच एक महिला पाय घसरून रुळावर पडली. यावेळी ट्रेन सदर महिलेच्या दोन्ही पायांवरून गेल्याने महिलेला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी आरडाओरड करताच मोटरमनने ट्रेन थांबवली आणि महिलेला बाहेर काढण्यात आलं. या दुर्घटनेत महिलेचा जीव वाचला असला तरी आता तिला आपले पाय मात्र गमवावे लागले आहेत.
मुंबई आणि परिसरात कशी असणार पावसाची स्थिती?
पुढील २४ तासांत मुंबई शहरासह आजूबाजूच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. रात्रभरात झालेला पाऊस आणि आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांनी शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळणंच आवश्यक आहे.