नवी मुंबई : कोपर खैरणे परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५ गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील १७ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांनी मुंब्रा परिसरात त्याला घेराव घातला असता त्याने सुटकेसाठी प्रतिकार केला असता पोलिसांनी बळाचा वापर करून त्याचं मुसक्या आवळल्या.
कोपर खैरणे परिसरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मागावर पोलिस होते. त्यासाठी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून त्यामध्ये सक्रिय गुन्हेगारांची माहिती मिळवली जात होती. यासाठी वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांनी निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक निरीक्षक सागर टकले, उपनिरीक्षक मंगेश कन्नेवाड, हवालदार योगेश डोंगरे, संतोष चिकणे, विनोद कांबळे, दीपाली पवार, औदुंबर जाधव आदींचे पथक केले होते. त्यामध्ये मुंब्रा येथे राहणाऱ्या रिजवान उस्मान खान (२४) याची माहिती समोर आली. तसेच गतवर्षी खैरणे येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातही त्याचा हात होता असेही समोर आले. यावरून त्याच्या अटकेसाठी १३ मार्चला कोपर खैरणे पोलिसांचे पथक मुंब्रा परिसरात दबा धरून बसले होते. मात्र रिजवान याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
परंतु पोलिसांनीही पाठलाग करून बळाचा वापर करून त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी अंग झडतीमध्ये त्याच्याकडे आठ ब्लेड आढळून आले. रिजवान हा सराईत गुन्हेगार असून तो त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिक, पोलिसांवर ब्लेडने हल्ले करायचा. यासाठी तो नियमित तोंडात जिभेखाली तसेच शर्ट, पॅन्ट यामध्ये ठिकठिकाणी ब्लेड लपवून ठेवायचा. पोलिसांना त्याच्या या हल्ल्याच्या पद्धतीची माहिती असल्याने त्याला पकडताच झडती घेऊन त्याच्याकडील सर्व ब्लेड काढून घेतले.
अधिक चौकशीत त्याने ५ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामधील १७ तोळे सोन्याचे चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले असल्याचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी सहायक आयुक्त योगेश गावडे यांच्यासह तपास पथकाचे अधिकारी उपस्थित होते.