नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानक बाहेरील परिसरात अस्वच्छता, उघडा नाला आदींमुळे या ठिकाणी सर्पांचा वावर वाढला आहे. यामुळे प्रवाशांच्या आणि परिसरातील नागरी वाहतींमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरात आढळलेल्या सुमारे साडेदहा फूट लांब अजगराला सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे. या अजगराचे वजन १७ किलोहून अधिक होते.
रेल्वे प्रवासी आणि स्थानकामधील कर्मचाऱ्यांना स्थानक परिसरात मोठा साप दिसल्याने त्यांनी जुईनगर रेल्वे स्थानकाबाहेरील नाल्यावरील पादचारी पुलाखाली मोठा साप वेटोळे मारून बसल्याची माहिती नागरिकांनी पुनर्वसु फॉउंडेशनला दिली. घटनेची माहिती पुनर्वसु फॉउंडेशन मधील सर्पमित्र निलेश पवार , साहील पवार, मयूर पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सापाची पाहणी केली असता एका अरुंद जागेत वेटोळे मारलेला साप असल्याचे आढळले. नाल्यातील चिखल, कचरा, दुर्गंध आणि अरुंद जागा यामुळे बचावकार्य अवघड असल्याचे सर्पमित्रांच्या लक्षात आले. सर्पमित्र निलेश त्या अरुंद जागेत खाली झोपून सरपटत आत शिरून सापाच्या जवळ पोहचले सापाची पाहणी केल्यावर सदर साप भारतीय अजगर जातीचा मोठा साप वेटोळे मारून बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. अरुंद जागा, कचरा, आणि चिखल असल्याने तसेच साप वजनाने जड असल्याने अजगराला बाहेर काढणे अवघड काम होते. निलेश यांनी सर्पमित्र साहील व मयूर यांच्या मदतीने सुमारे अर्ध्यातासाच्या प्रयत्नांने या अजगराला मोकळ्या आवारात आणले. त्यानंतर उपस्थितांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सर्पमित्रांनी अजगाराबाबत माहिती दिली. नागरिकांनी देखील सर्पमित्रांच्या कामाचे कौतुक केले. अजगराला कोणतीही इजा झाली नसल्याची आणि अजगर सुरक्षित असल्याची खात्री करून सुरक्षित रित्या जंगलात सोडण्यात आले. रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात स्वच्छता होत नसल्याने तसेच अस्वच्छ उघड्या नाल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून रेल्वे स्थानक परिसरात स्वछता करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.