नवी मुंबई: उरण येथील वेअरहाऊसला लागलेल्या आगीचा उलगडा करून पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यांनी दोन कोटींच्या सुपारीची केलेली चोरी उघड होऊ नये यासाठी संपूर्ण वेअरहाऊसच पेटवून दिले होते. त्यामद्ये तब्बल १८ कोटीच्या मालाचे नुकसान झाले होते. मात्र या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता काही कामगारांच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी हि आग लागली नसून लावली असल्याचा प्रकार उघडकीस आणला.
उरणच्या कंठवली येथील सामवेदा लॉजिस्टिक या वेअरहाऊस मध्ये आग लागल्याची घटना ९ जानेवारीला घडली होती. यामध्ये त्याठिकाणी साठा असलेली १८ कोटींची सुपारी जळून खाक झाली होती. शिवाय आगीच्या या घटनेमुळे परिसरातील इतरही गोडावून धोक्यात आले होते. या घटनेनंतर उरण पोलिसांनी अधिक तपासाला सुरवात केली होती. आग लावली कि लागली याचा उलगडा करण्यासाठी वेअरहाऊस मधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पोलिसांनी मिळवले होते. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिवाजी हुलगे अधिक तपास करत होते.
त्यांना आगीच्या काही वेळ अगोदर सुपारीचा साठा असलेल्या ठिकाणी काही कामगार संशयितरित्या ये जा करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. यामुळे त्यांची वेगवेगळी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यामध्ये त्यांनी सुपारीची चोरी लपवण्यासाठी आग लावल्याचे उघड झाले. त्यानुसार रोमेश भुवड, सिद्धेश रहाटे, किरण पंडित, दिगंबर वानखेडे, संजय घाग, सचिन कदम व पांडुरंग उर्फ पांड्या शेरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यातले पाच जण कंपनीचे कामगार असून दोघे बाहेरचे सहकारी आहेत.
त्यांनी मिळून मागील काही दिवसात वेअरहाऊस मधून सुमारे २ कोटींच्या सुपारीची चोरी केली होती. मात्र मालाची तपासणी झाल्यास आपली चोरी उघड होईल याची त्यांना भीती होती. त्यामुळे आगीची दुर्घटना घडवून आणण्याचा कट रचून त्यांनी आग लावली होती. त्यामध्ये वेअरहाऊसमध्ये असलेली १६ कोटींची सुपारी, इतर साहित्य व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. अटकेनंतर त्यांच्याकडून चोरीच्या सुपारीच्या ३०० गोण्या हस्तगत केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले. तर उर्वरित २०० गोण्यांबद्दल अधिक तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये त्यांचे इतर साथीदार आहेत का ? याचाही अधिक तपास उरण पोलिस करत आहेत.