डीपीएस तलावाचे चोक पाँईंट तोडण्यासाठी आठवड्याचा अल्टिटेम; गणेश नाईक उतरले मैदानात
By नारायण जाधव | Published: May 23, 2024 03:59 PM2024-05-23T15:59:13+5:302024-05-23T15:59:40+5:30
या भेटीत नाईक यांनी आठवडाभरात चोक पाँईट तोडले नाहीत तर स्वत्च मैदानत उतरून जेसीबी लावून ते तोडतील, असे सिडकोचे मुख्य अभियंता एन.सी. बायस आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ येथील ३० एकरांवरील डीपीएस फ्लेमिंगो तलाव स्थलांतरित पक्ष्यांचे निवासस्थान म्हणून पुनर्संचयित करण्याच्या पर्यावरणवाद्यांच्या मोहीमेला भाजपचे आमदार गणेश यांनी मोठे बळ दिले आहे. घाटकोपर येथे एमिरेटसच्या विमानाने दिलेल्या धडकेत ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्यानंतर हळहळलेल्या नाईक यांनी या गुलाबी पक्ष्यांचा अधिवास असलेल्या या तलावाची गुरुवारी पाहणी करून आठवडाभरात त्यात येणारे भरतीचे पाणी रोखणारे चोक पाँईंट तोडण्यासाठी आठवडाभराचा अल्टिटेम दिला आहे.
या भेटीत नाईक यांनी आठवडाभरात चोक पाँईट तोडले नाहीत तर स्वत्च मैदानत उतरून जेसीबी लावून ते तोडतील, असे सिडकोचे मुख्य अभियंता एन.सी. बायस आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.
येथील वापरात नसलेल्या प्रवासी वाहतूक जेट्टीवर जाण्यासाठी बांधलेल्या रस्त्यामुळे तलावाकडे जाणारी मुख्य जलवाहिनी गाडली गेली असून त्यामुळे तलाव पूर्णपणे कोरडा झाला आहे. यामुळे अन्न मिळत नसल्याने तो फ्लेमिंगो भरकटत असल्याच्या पर्यावरणप्रेमींच्या आरोपास दुजोरा दिला.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा
तलावातील पाण्याचा प्रवाह रोखून सिडको अधिकाऱ्यांचा त्याच्या ३० एकर भूखंडाचे व्यापारीकरण करण्याचा गुप्त हेतू दिसतो. परंतु, हा कुटील डाव गणेश नाईक यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला. तलाव नष्ट झाल्यास नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटीची ओळख नष्ट होईल, असे ते म्हणाले. यातील तत्कालिन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.
जैवविविधता नष्ट करण्याचे सिडकाचे कारस्थान
या पाहणी प्रसंगी नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले की, सिडकोने आपल्या विकास आराखड्यात, "भावी विकासासाठी" तलाव आधीच चिन्हांकित केला आहे. नगररचनाकार सिडको जैवविविधतेला मूठमाती देत निसर्गाशी खेळत असल्याचे कुमार म्हणाले.
खारफुटी संवर्धन समिती बुधवारी देणार भेट
नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या तक्रारीवरून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्याच्या पर्यावरण विभागाला सरोवराची तोडफोड केल्याच्या आरोपांची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले आहे. तसेच न्यायालयाने नेमलेली खारफुटी संरक्षण आणि संवर्धन समिती येत्या बुधवारी जागेच्या पाहणी करणार असल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले.
तलाव संवर्धनाचे न्यायालयाचे निर्देश
नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्वेशन सोसायटीमधील वीरेंद्रकुमार गांधी आणि संदीप सरीन यांनी नाईक यांना सांगितले की, ,खरे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने हा तलाव संरक्षित आहे. न्यायालयाने साडेपाच वर्षांपूर्वीच सिडकोला तलावातील पाण्याचा प्रवाह थांबणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
डीपीएस तलाव वाचविण्याचे आवाहन
माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, प्रख्यात लेखक जयंत हुदर यांनी डीपीएस तलाव वाचविण्याचे आवाहन केले आहे. सेव्ह फ्लेमिंगोज अँड मँग्रोव्हज ग्रुपच्या रेखा सांखला यांनी पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या नागरिकांसोबत सिडको असे का वागते, हे समजू शकलेले नाही, अशी खंत व्यक्त केली.