मधुकर ठाकूर
उरण : कलमारद्वारे कंटेनर उचलून रांगेत ठेवताना दोन कंटेनरमध्ये चेंगरुन एका ३८ वर्षीय कामगाराचा जागीच दुदैवी मृत्यू झाला असल्याची घटना सोमवारी (५) उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
उरण तालुक्यातील भेंडखळ येथे कोनेक्स टर्मिनल यार्ड आहे. या कंपनीमध्ये कंटेनर मालाची हाताळणी केली जाते. कंटेनरची चढ-उतार करून व्यवस्थितरीत्या ठेवण्याचे काम स्थानिक भाजपचे आमदार महेश बालदी व त्यांचे अन्य दोन सहकारी यांच्या इशा लॉजिस्टिक्स कंपनीला देण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कलमारद्वारे कंटेनर उचलून रांगेत ठेवण्याचे काम सुरू होते. कलमार चालकासोबत त्याचा हेल्पर प्रवीण सिंग नेगी (३८) रा.गढवाल- युपी हा देखील काम करत होता. मात्र ४० फुटी लांबीचा आणि मालाने भरलेला ४० टन वजनाचा कंटेनर उचलून जमिनीवर ठेवताना दोन कंटेनरमध्ये हेल्पर चिरडून जागीच ठार झाला.
कलमार चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे तपास अधिकारी एपीआय विजय कुमार कावळे यांनी सांगितले.