पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक, पनवेल स्थानकाबाहेर सापळा रचून कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 18, 2024 07:51 PM2024-03-18T19:51:26+5:302024-03-18T19:51:42+5:30
यावेळी रेल्वेने प्रवास करून आलेला एकजण पोलिसांच्या नजरेस पडताच त्याला थांबवण्याचा इशारा केला.
नवी मुंबई : पनवेल रेल्वेस्थानकाबाहेरून पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे. अटक केलेला तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा असून त्याठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा अशी शक्यता आहे. तत्पूर्वीच पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पनवेल रेवेस्थानकाबाहेर एकजण अग्निशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद लभडे, अभयसिंह शिंदे, हवालदार अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, महेंद्र आयकर, सूर्यकांत कुडावकर, प्रसाद घरत, किरण कराड, साईनाथ मोकळ आदींचे पथक केले होते. त्यांनी रविवारी संध्याकाळच्या सुमारास पनवेल स्थानकाबाहेर पार्किंगमध्ये सापळा रचला होता.
यावेळी रेल्वेने प्रवास करून आलेला एकजण पोलिसांच्या नजरेस पडताच त्याला थांबवण्याचा इशारा केला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून पकडण्यात आले. यावेळी त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये एक जिवंत पिस्तूल व दोन काडतुसे आढळून आले. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. यावरून त्याठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. अंकित सुरेश कुमार (२३) असे सदर तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.