बुडालेल्या जहाजातून वाचलेले तरूण कुवेतमधील तुरूंगात अडकले: ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनच्या प्रयत्नाने सुखरूप सुटका

By नामदेव मोरे | Published: March 1, 2024 07:31 PM2024-03-01T19:31:26+5:302024-03-01T19:31:35+5:30

नाशिकच्या तरूणांची शोकांतीका

A young survivor of a shipwreck is stuck in a prison in Kuwait | बुडालेल्या जहाजातून वाचलेले तरूण कुवेतमधील तुरूंगात अडकले: ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनच्या प्रयत्नाने सुखरूप सुटका

बुडालेल्या जहाजातून वाचलेले तरूण कुवेतमधील तुरूंगात अडकले: ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनच्या प्रयत्नाने सुखरूप सुटका

नवी मुंबई : नाशिकमधील दोन तरूण डिसेंबर २०२३ मध्ये नोकरीसाठी इराणमधील जहाजावर गेले होते. कुवेतच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातून सुदैवाने ते दोघे वाचले पण तेथील तुरूंगात अडकले. ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनच्या पाठपुराव्यानंतर दोन्ही तरूणांची सुटका झाली असून १ मार्चला ते सुखरूप मुंबईत परतले आहेत.

अविष्कार जगताप व निवृत्ती बागूल अशी सुटका झालेल्या तरूणांची नावे आहेत. या दोघांना एक एजंटने सेल्फ ईमायग्रेशनच्या माध्यमातून इराणला पाठविले होते. तेथील जहाजावर नोकरी करत असताना १९ जानेवारीला कुवेतच्या किनाऱ्यावर त्यांचे जहाज बुडाले. जहाजावरील इतर सहकारी बुडाले परंतु अविष्कार व निवृत्ती हे दोघे बोटीतून सुखरूप किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले. कुवेतमधील अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले व उपचारानंतर त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकले. जहाज बुडाल्यामुळे पासपोर्ट व इतर कागदपत्रेही हरविली होती. शेतकरी कुटुंबातील या तरूणांना सोडविण्याचे आव्हान कुटुंबियांसमोर उभे राहिले होते. ऑल इंडिया सिफेरर्स यूनियनने यापुर्वी अशाप्रकारे विदेशात अडकलेल्या तरूणांची सुटका केल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी युनीयनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे व अध्यक्ष संजय पवार यांच्याशी संपर्क साधला. या दोघांनी कुवेतमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधून दोन्ही तरूणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.

भारतीय दुतावास व परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून अखेर या दोन्ही तरूणांना तुरूंगातून बाहेर काढण्यात व त्यांना सुखरूप भारतामध्ये आणण्यात यश आले आहे. १ मार्चला दोन्ही तरूण मुंबईत दाखल झाले असून त्यांनी सिफेरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

एजंटकडून होते फसवणूक
नोकरीची गरज असलेल्या तरूणांना इराण, मलेशिया, दुबई, सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये पाठविले जाते. या व्यवसायात अनेक बोगस दलालही सक्रीय झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून जहाजावर गेलेल्या तरूणांची कागदपत्र काढून घेतली जातात. अनेक तरूण तेथे अडकत असून अशा प्रकारे तरूणांना गुलामगीरीत ढकलणाऱ्या दलालांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही सिफेरर्स यूनियनने नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

एक महिन्यापासून कुवेतमध्ये अडकलो होतो. ऑल इंडीया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यामुळे तेथून सुटका झाली व पुन्हा मायदेशी परत आलो आहोत.
अविष्कार जगताप,नाशिक

कुवेतच्या किनाऱ्याजवळ १९ जानेवारीला रात्री आमचे जहाज बुडाले. अनेक सहकारीही बुडाले. आम्ही सुखरूप किनाऱ्यावर पोहचले पण तेथेच अडकलो होतो. सिफेरर्स युनीयनच्या प्रयत्नाने सुखरूप सुटका झाली
निवृत्ती बागुल, नाशिक

नाशिकमधील दोन खलाशी कुवेतमध्ये अडकल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी निदर्शनास आणून दिले. संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांची सुखरूप सुटका करण्यास सहकार्य केले.
संजय पवार, अध्यक्ष ऑल इंडिया सिफेरर्स युनियन

Web Title: A young survivor of a shipwreck is stuck in a prison in Kuwait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.