बनावट निवडणूक ओळखपत्राद्वारे आधारकार्ड, टोळीचा भांडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:22 AM2020-01-11T00:22:01+5:302020-01-11T00:22:04+5:30
बनावट शासकीय ओळखपत्रे बनवून देणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : बनावट शासकीय ओळखपत्रे बनवून देणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट १३ निवडणूक ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याआधारे संबंधितांना आधार कार्ड बनवून दिल्याचेही उघड झाले आहे.
बनावट आधार कार्ड बनवणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मोटारवाहन चोरी शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांनी सहायक निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक योगेश वाघमारे आदीचे पथक तयार केले होते. त्यांना बोनकोडे येथील एक एजंट बनावट आधार कार्ड बनवून देत असल्याची माहिती मिळाली. यानुसार त्यांनी बनावट ग्राहक तयार करून मोहम्मद आझाद (२९) याच्याशी संपर्क साधला होता. या वेळी त्याने सदर बनावट ग्राहकाला बनावट निवडणूक ओळखपत्र बनवून दिले. त्यानंतर दुसरा साथीदार रोहितकुमार यादव (२९) याने बनावट आधार कार्डसाठी बनावट निवडणूक ओळखपत्राद्वारे प्रक्रिया केली. याच वेळी पोलिसांनी त्यांना पकडले असता, त्यांच्याकडे १३ बनावट निवडणूक ओळखपत्रे आढळून आली. त्यांनी अनेक व्यक्तींना भारतात वास्तव्याचा कोणताही आवश्यक पुरावा नसतानाही बनावट निवडणूक ओळखपत्राद्वारे आधार कार्ड बनवून दिल्याचे उघड झाले. त्यामध्ये बांगलादेशी अथवा इतर देशाबाहेरील व्यक्तींचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १८ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रोहितकुमार यादव हा तुर्भेचा राहणारा असून, पूर्वी तो आधार सेंटर चालवायचा. सध्या तो आधार काढण्यासाठी लागणाºया मशिन पुरवायचे काम करतो. यामुळे बहुतांश आधार सेंटरवर त्याच्या ओळखी आहेत. याच ओळखीचा फायदा घेऊन कोणत्याही चौकशीशिवाय बनावट निवडणूक ओळखपत्राद्वारे आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण करायचा. यानुसार या दुकलीने मोठ्या प्रमाणात गैरपद्धतीने आधार कार्ड काढून दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करत आहेत.