पळस्पे फाटा हद्दीच्या वादात अनधिकृत पार्किंगला अभय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:25 AM2021-03-12T00:25:53+5:302021-03-12T00:26:09+5:30
मुंबई- गोवा महामार्ग : अवजड वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावर तसेच सर्व्हिस रोडवर सध्या मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांसह येथील स्थानिक ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे पळस्पे फाटा परिसरात पनवेल शहर व नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दी विभागल्या गेल्या असल्याने कारवाई कोणी करायची, या प्रश्नामुळे अनधिकृत वाहने पार्क करणाऱ्या वाहनचालकांना अभय मिळाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे फाटा येथून पुढे कर्नाळा अभयारण्य परिसरापर्यंत ठिकठिकाणी अशाप्रकारची वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. विशेष म्हणजे पळस्पे गावाजवळ उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर अनेक जण सर्रास वाहने उभी करीत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे. याच परिसरात असलेल्या जेडब्लूसीचे मोठे गोदाम असल्याने सतत अवजड वाहनांची ये-जा असते. ही वाहने थेट रस्त्यावरच अथवा सर्व्हिस रोडवर उभी करून ग्रामस्थांना अटकाव केल्याचा प्रयत्न केला जातो. पनवेल शहर वाहतूक पोलिसांची हद्द पळस्पे उड्डाणपुलापर्यंत आहे तर त्यापुढील हद्द ही नवीन पनवेल वाहतूक पोलिसांची आहे. अनेक वेळा तक्रार केल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून हद्दीचे कारण पुढे केले जात आहे. या ठिकाणी वाढत चाललेल्या त्रासातून सुटका करण्याची मागणी येथील रहिवासी करीत आहेत.
कारवाई होत नसल्याने तक्रार नाही
कित्येक वर्षे याठिकाणचे बेकायदेशीर पार्किंग ग्रामस्थांची डोकेदुखी ठरली आहे. कारवाई होत नसल्याने आम्ही याबाबत तक्रार करणे सोडून दिल्याचे मत काही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
कारवाई करण्याचे आश्वासन
पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या अनधिकृत पार्किंगसंदर्भात नवीन पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांना यापूर्वीही नोटिसा दिल्या गेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पनवेल शहर वाहतूक शाखेच्या अखत्यारित येणाऱ्या हद्दीत अनधिकृत पार्किंगवर कारवाई केली जाईल, असे पनवेल शहर वाहतूक शाखेचे अभिजित मोहिते यांनी सांगितले.