अबब! लक्ष्मीपूजनाच्या रात्री नवी मुंबईकरांनी केला २७ टन कचरा

By नारायण जाधव | Published: November 13, 2023 03:03 PM2023-11-13T15:03:13+5:302023-11-13T15:03:47+5:30

आठ विभाग कार्यालयांच्या अखात्यारीत स्वच्छता मोहीम

Abb! On the night of Lakshmi Puja, Navi Mumbaikars generated 27 tons of garbage | अबब! लक्ष्मीपूजनाच्या रात्री नवी मुंबईकरांनी केला २७ टन कचरा

अबब! लक्ष्मीपूजनाच्या रात्री नवी मुंबईकरांनी केला २७ टन कचरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सारा देश दिवाळी आपल्या घरादारांच्या स्वच्छतेस प्राधान्य देत असताना स्वच्छ शहरांच्या यादीत प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईकरांनी लक्ष्मी पूजनाच्या रात्री खाद्यपदार्थांसह फटाके आणि फुलांचा तब्बल २७ टन ७०० किलो कचरा करून आपल्या असंवेदनशिलतेचे दर्शन घडविले. तर शहरवासीयांनी केलेला हा कचरा नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आठ विभागीय कार्यालयांच्या अखात्यारीत विशेष पथकांद्वारे साफ करून आपल्या कार्यतत्परेतेच दर्शन घडविले.

दिवाळी म्हटले की, सर्व जण आपली घरे, दारे, कार्यालये, दुकाने स्वच्छ करतात. दिवाळीच्या आधीच ही स्वच्छतो माेहीम सुरू असते. परंतु, वसुबारसपासून सुरू असलेला दिवाळसण खऱ्या अर्थाने साजरा होतो लक्ष्मीपूजनानंतर. यादिवशी प्रत्येक घरात, कार्यालयात, दुकानदारांकडून विधीवत पुजाअर्चा केली जाते. फुलांची आरास केली जाते. तोरणे बांधली जातात. नंतर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र, हे करताना अनेक जण उरलेली फुले, तोरणांचा कचरा आणि अंगणात, परिसरात फोडलेल्या फटाक्यांचा कचरा तसाच ठेवतात.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विशेष स्वच्छता मोहीमेकरिता आठही विभाग कार्यालय क्षेत्रात ३७५ सफाई कर्मचारी यांची विशेष नेमणूक केली होती. १० रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने आणि १३ मिनी टिपर वाहने यांच्या माध्यमातून या स्वच्छता मोहीमेत गोळा केलेला प्रामुख्याने फटाक्यांच्या कच-यासह इतर कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी त्वरित वाहून नेला. स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे या संपूर्ण साफसफाई मोहीमेच्या कार्यवाहीवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सर्व ठिकाणी भेटी देत बारकाईने लक्ष ठेवून होते.

शहरातील आठही विभागातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे अशा नागरिकांची गजबज असलेल्या स्थळांवर पहाटे १ ते ५ या कालावधीत राबविलेल्या या विशेष साफसफाई मोहीमेमध्ये हार, फुले. खाद्यपदार्थ यांचा ९ टन ६०० किलो ओला कचरा तसेच विशेषत्वाने फटाके, कागद, पुठ्ठे, कापड यांचा १८ टन १०० किलो सुका कचरा गोळा करून एकूण २७ टन ७०० किलो कचरा स्वतंत्र वाहनांमध्ये तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला. यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशीही नवी मुंबईतील रस्ते सकाळी स्वच्छ दिसत होते, अशी माहिती राजळे यांनी दिली.

Web Title: Abb! On the night of Lakshmi Puja, Navi Mumbaikars generated 27 tons of garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.