एपीएमसी हिट अँड रन प्रकरणी अबॉटच्या जामिनावर आज निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 01:51 AM2021-03-23T01:51:41+5:302021-03-23T01:52:03+5:30
पोलीस पुत्र अक्षय गमरे व संकेत गमरे यांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक रोहन अबॉट याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नवी मुंबई : एपीएमसीमधील हिट अँड रन प्रकरणातील हॉटेल व्यावसायिक रोहन अबॉट याच्या सुनावणीवर मंगळवारी निर्णय दिला जाणार आहे. या प्रकरणी सोमवारी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपली बाजू मांडली आहे. दरम्यान, नव्याने लागलेल्या कलमामुळे अबॉटचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे.
पोलीस पुत्र अक्षय गमरे व संकेत गमरे यांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक रोहन अबॉट याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एपीएमसी पोलिसांच्या हलगर्जीमुळे त्याला जामीन मिळाला असल्याचा आरोप गमरे परिवाराने केला आहे. त्यानुसार अबॉट याचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली असता अबॉट व गमरे परिवाराच्या वकिलांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडली. सकाळी सुरू झालेल्या या सुनावणीवर दुपारपर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होता. यादरम्यान फिर्यादींच्या मागणीनंतर पोलिसांनी अबॉट याच्यावर अजामीनपात्र गुन्ह्याची कलमे लावली असल्याचेही समोर आले आहे. त्यावरून गमरे परिवाराच्या मागणीनुसार अबॉट याचा जामीन रद्द होण्याची दाट शक्यता आहे. अबॉट हा जामिनावर असल्याने गमरे परिवारावर दबाव येत असल्याचे तसेच आमिष दाखविले जात असल्याचा आरोप त्यांच्या वकील आभा सिंग यांनी यापूर्वीच केला आहे. शिवाय अपघाताच्या रात्री रोहन अबॉट मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे तो उशिरापर्यंत चालणाऱ्या कोणत्या पार्टीमधून आला होता, याचाही उलगडा होण्यासाठी पोलिसांना त्याचा ताबा आवश्यक आहे.