माथाडींच्या १०० कोटींच्या ठेवींचा अपहार; सीबीआय चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 01:51 AM2019-12-06T01:51:01+5:302019-12-06T01:51:20+5:30
राज्यात विविध ३६ मंडळाच्या अखत्यारित जवळपास ५० हजार माथाडी कामगार कार्यरत आहेत.
नवी मुंबई : माथाडी बोर्डांनी बँकांमध्ये ठेवलेल्या सुरक्षित ठेवी असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. चार बोर्डांचे भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटीसाठीच्या तब्बल १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर येऊ लागले असून, यामुळे माथाडींमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली असून, कामगारांच्या हितासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कामगारांच्या पैशांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. राज्यात विविध ३६ मंडळाच्या अखत्यारित जवळपास ५० हजार माथाडी कामगार कार्यरत आहेत. कामगारांचे वेतन, भत्ते, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी व इतर व्यवहार या मंडळाच्या मार्फत केले जातात. हे सर्व पैसे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्यात येतात. दि रेल्वे एस्टॅब्लिशमेंट बोर्ड (रेल्वे बोर्ड), मुंबई लोखंड व पोलाद कामगार मंडळ (आयर्न बोर्ड), कापड बाजार आणि दुकाने मंडळ (कापड बोर्ड), धातू व कागद बाजार दुकाने मंडळ (मेटल बोर्ड) या चार बोर्डांनीही विविध बँकांमध्ये पैसे गुंतविले होते.
संबंधित बँकांमधून जवळपास १०० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. यामध्ये रेल्वे बोर्डातून २२ कोटी, आयर्न बोर्डातील ३५ कोटी, कापड बोर्डातील पाच कोटी व मेटल बोर्डातील १८ कोटी रुपयांचा समावेश आहे. खोट्या सह्या करून हे पैसे हडप करण्यात आले आहेत. या घोटाळ्यामध्ये जे सहभागी आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी. माथाडी बोर्ड, बँक व्यवस्थापन व इतर जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
माथाडी कामगार दिवसभर कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत. ग्र्रोसरी बोर्ड ठरावीक कालावधीनंतर गुंतविलेल्या पैशांचा आढावा घेत असते. त्याच धर्तीवर इतर बोर्डांनीही आढावा घेतला पाहिजे. चार बोर्डाप्रमाणे इतर बोर्डांमध्येही पैशांचा अपहार झाला आहे का? याची चौकशी करण्यात यावी. बँकांमधून अशाप्रकारे पैसे जाणे ही गंभीर गोष्ट आहे. कामगारांचे सर्व पैसे परत मिळालेच पाहिजेत. याविषयी चर्चा करण्यासाठी बोर्डाचे अधिकारी व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली जाईल.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याविषयी निवेदन देण्यात येणार आहे. माथाडी बोर्डाप्रमाणे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, राज्यातील इतर शासकीय व निमशासकीय आस्थापनांनी बँकांमध्ये गुंतविलेल्या पैशांचा अशाप्रकारे अपहार
झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, यासाठी संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदारांना करणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
कामगारांमध्येही संभ्रमाचे वातावरण
माथाडी कामगार दिवसभर कष्ट करत असतात. त्यांच्या भविष्यासाठी ठेवलेल्या पैशाचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बोर्डामध्ये जाऊन विचारणा केल्यानंतरही योग्य माहिती दिली जात नसल्याने संभ्रम वाढत आहे. बोर्डाने कामगारांच्या पैशांच्या गुंतवणुकीची माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कामगारांच्या हिताला धक्का लागला तर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
घोटाळ्यात रॅकेट सक्रिय
बँकांमध्ये ठेवलेले पैसे बनावट सह्या करून परस्पर काढून घेणारे रॅकेट सक्रिय आहे. बाजार समिती, माथाडी बोर्ड व इतर आस्थापनांचे पैसेही परस्पर हडपल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय आहे. यामध्ये बँकेतील अधिकारीही सहभागी असतात. घोटाळ्यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असून, ते रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याची मागणीही माथाडी नेत्यांनी केली आहे.
एक सदस्यीय बोर्डामुळे गोंधळ
माथाडी बोर्डावर दहा वर्षांपासून एक सदस्यीय समिती आहे. बोर्डाच्या अध्यक्षांकडेच सर्व अधिकार एकवटले आहेत. कामगार प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आलेली नाही. कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहतात. एक सदस्यीय बोर्ड असल्याने कामकाज व्यवस्थित होत नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी निदर्शनास आणले.
माथाडी कामगारांच्या कष्टाच्या पैशांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी कामगार आयुक्त व बोर्डाच्या प्रमुखांकडे पत्रव्यवहार केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणे आवश्यक आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, कामगारांचे पैसे पुन्हा मिळावे यासाठी पाठपुरावा करणार असून, वेळ पडल्यास आंदोलन केले जाईल.
- शशिकांत शिंदे, माथाडी नेते