नवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने अभय योजना लागू केली आहे. १ ते ३१ मार्चपर्यंत ही योजना लागू असणार आहे. २० मार्चपर्यंत कर भरणारांचा ७५ टक्के दंड माफ केला जाणार असून पुढील दहा दिवसांसाठी ५० टक्के दंड माफ केला जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ताकराचा महत्वाचा वाटा आहे. २०२३ - २४ या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने ८०० कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट निश्चीत केले होते. यापैकी जानेवारीपर्यंत ५२० कोटी रूपये कर संकलीत झाला आहे. उर्वीरीत उद्दीष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निश्चीत केले आहे. थकबाकीदारांमुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडथळा येत आहे.
मालमत्ता धारकांनाही दिलासा देण्यासाठी व जास्तीत जास्त कर संकलीत करण्यासाठी महानगरपालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. १ मार्च ते ३१ मार्च पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. १ ते २० मार्च दरम्यान कराची मुळ रक्कम व २५ टक्के दंड रक्कम भरल्यास उर्वरीत ७५ टक्के दंड माफ केला जाणार आहे. २१ ते ३१ मार्च या दहा दिवसांमध्ये मुळ थकीत रक्कम व ५० टक्के दंड रक्कम भरल्यास उर्वरीत ५० टक्के दंड माफ केला जाणार आहे.
१ एप्रिलनंतर पुन्हा अभय योजना लागू केली जाणार आहे. नागरिकांना कर भरणा करण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. महानगरपालिकेचे संकेतस्थळ व एनएमएमसी ई कनेक्ट या मोबाईल ॲपवरही कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महानगपालिकेची सर्व विभाग कार्यालय व मुख्यालयामध्ये कर संकलनांची सोय करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मालमत्ताकर धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.