नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्केपर्यंत सूट देणारी अभय योजना १ डिसेंबरपासून पुढील चार महिने सुरू होत असून, या योजनेमुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सुवर्णसंधीचा मालमत्ता करथकबाकीदारांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने २७ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरिता अभय योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या ठरावाला शासनाने १३ सप्टेंबर २०१९ रोजी मंजुरी दिलेली होती.
नवी मुंबई शहरात एक लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ता करधारक असून, त्यामध्ये ६८ हजार ६३३ गावठाण, १५ हजार ८०१ विस्तारित गावठाण आणि ५८ हजार ९९१ सिडको विकसित नोडमधील मालमत्ता, सोसायटी भूखंड यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कराची थकबाकी २१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, या अभय योजनेमुळे थकबाकीदार नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे, तसेच थकबाकीची मोठी रक्कम वसूल होऊन शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे.
पुढील चार महिने दोन टप्प्यात ही मालमत्ता कर अभय योजना लागू असणार आहे. शहरातील नागरिकांनी थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रकमेवर ७५ टक्केपर्यंत माफी देणाऱ्या या अभय योजनेच्यार् संधीचा लाभ घ्यावा व त्यायोगे शहराच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावावा, असे आवाहन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. अभय योजनेमुळे पालिकेच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.योजनेचे टप्पे१ डिसेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ता कराची रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रकमेतून ७५ टक्के माफी मिळणार आहे.१ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० या पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ता कराची रक्कम अधिक ३७.५० टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रकमेतून ६२.५० टक्के माफी मिळणार आहे.कसा करणार भरणाया रकमेचा भरणा आॅनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएसच्या माध्यमातून करता येणार असून, महापालिका मुख्यालयाप्रमाणेच सर्व विभाग कार्यालये आणि संलग्न भरणा केंद्रे या ठिकाणी रोख, धनादेश, धनाकर्ष याद्वारे स्वीकारण्याची सुविधा असणार आहे. याशिवाय नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अभय योजनेकरिता काही विशेष भरणा केंद्रेही सुरू करण्यात येत असून, त्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.