मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी अभय योजना; महापालिकेची १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:52 AM2020-12-04T01:52:50+5:302020-12-04T01:52:55+5:30
मोबाइल ॲपवरही विशेष लिंक देण्यात येणार आहे. ‘अभय योजना’ राबविताना थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. थकबाकीदारांना सौजन्यपत्रे दिली जाणार आहेत.
नवी मुंबई : मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेने ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारीदरम्यान ही योजना असणार असून, थकबाकीदारांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्केपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे अनेकांना मालमत्ता कर भरता आलेला नाही. ज्या व्यवसायिक व निवासी मालमत्तांचे कर अनेक वर्षांपासून थकले आहेत, त्यांच्या व्याजाची व दंडाची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे पालिकेने मालमत्ता करामध्ये सूट द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघासह अनेक लोकप्रतिनिधींनी केली होती. याची दखल घेऊन आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. १५ डिसेंबरपासून १५ फेब्रुवारीपर्यंतच ही योजना आहे. या कालावधीमध्ये थकबाकीदारांनी कराची संपूर्ण रक्कम भरली व दंडापैकी २५ टक्के रक्कम भरली तर त्यांना उर्वरित ७५ टक्के दंडात्मक रकमेमध्ये सूट दिली जाणार आहे. सर्व रक्कम एकाच वेळी भरावी लागणार आहे. टप्प्याटप्प्याने भरता येणार नाही. या योजनेसाठीची माहिती मनपाच्या संकेतस्थळावर व ८ विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. मोबाइल ॲपवरही विशेष लिंक देण्यात येणार आहे. ‘अभय योजना’ राबविताना थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. थकबाकीदारांना सौजन्यपत्रे दिली जाणार आहेत.
महानगरपालिकेची दुसरी अभय योजना
महानगरपालिका आयुक्तांनी दोन महिन्यांसाठी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली आहे. यापूर्वी १३ सप्टेंबर २०१९ रोजी शासनाने चार महिन्यांसाठी अभय योजना लागू केली होती. त्या वेळी शहरात १ लाख ४५ हजार ८८७ मालमत्ताधारकांकडे २१०० कोटी रुपये थकले होते. ७,५६४ जणांकडे १ लाखापेक्षा जास्त थकबाकी होती. यानंतर मनपाने पुन्हा एकदा थकबाकीदारांना संधी दिली आहे.
मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असून त्यामधूनच नागरी सेवासुविधांची परिपूर्तता केली जात आहे. अभय योजनेचा लाभ घेऊन लवकरात लवकर कर भरणा करून शहर विकासात योगदान द्यावे. - अभिजित बांगर, आयुक्त, महानगरपालिका