पनवेल:पनवेलच्या राजकारणात सक्रिय असलेले पनवेल कॉग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित पाटील यांना आपल्या रायफल शुटिंगची आवड जोपासताना थेट राज्यपातळीवरील घवघवीत यश संपादित करीत राष्ट्रीय स्पर्धत प्रवेश केला आहे.नुकतीच गुजरात येथे हि 50 मीटर रायफल प्रोन पोझिशन खेळ प्रकारातील पुरुष गटात अव्वल येत अभिजित पाटील यांनी गुजरात येथील दहाव्या वेस्ट झोन शूटिंग स्पर्धेत मानाचे स्थान पटकावले आहे.
आंतरराज्य, राज्यपातळी आणि थेट राष्ट्रीय पातळीवर धडक मारणाऱ्या अभिजित पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मागील महिन्यात पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे झालेल्या महाराष्ट्र एयर अँड फायरआर्म्स २०२३ स्पर्धेत रायगड, मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूर सह राज्यातील विविध जिल्ह्यातील ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये अभिजीत पाटील यांनी आपल्या नैपुण्याने सर्वोत्कृष्ट नेमबाजीचे दर्शन घडविले. अभिजित पाटील यांनी प्रथम फेरीत १०० पैकी ९५, द्वितीय फेरीत ९६, तृतीय फेरीत ९५, चौथ्या फेरीत ९७, पाचव्या फेरीत ९६ व अंतिम फेरीत ९८ गुण प्राप्त करीत ६०० पैकी ५७७ गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. त्यानंतर पाटील यांची निवड गुजराथ येथील स्पर्धेकरिता झाली.
कॉग्रेसचे सक्रिय पदाधिकारी , सेंट्रल रेल्वेच्या झोनल कमिटीचे सन्माननीय सदस्य, ऍनिमल वेल्फेअर असोसिएशन आदिठिकाणी कार्यरत असणाऱ्या अभिजित पाटील यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाज प्रशिक्षक तेजस रमेश कुसाळे हे नेमबाजीचा धडे देत आहेत.