शिक्षक मतदारसंघातून पहिल्या फेरीत ठाकरे गटाचे अभ्यंकर आघाडीवर
By कमलाकर कांबळे | Published: July 1, 2024 03:38 PM2024-07-01T15:38:37+5:302024-07-01T15:38:49+5:30
ठाकरे गटाचे बडे नेते मतमोजणी केंद्रावर हजर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून पहिल्या फेरीत ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर यांनी ६१ मतांची आघाडी घेतली आहे. तर शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार सुभाष मोरे पहिल्या फेऱ्याअंती पिछाडीवर आहेत. तर कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील पहिल्या फेरीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभा निकालावेळी मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात मतमोजणी वेळी झालेल्या कथित गैरप्रकाराची शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीवेळी पुनरावृत्ती होऊ नये, या दृष्टीने ठाकरे गटाचे बडे नेते सतर्क झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आणि युवासेना सचिव वरूण सरदेसाई, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी मतमोजणी केंद्रावर सकाळपासून तळ ठोकून बसले आहेत.