धर्मांतर केल्यावरच गर्भपाताला दिली परवानगी; विभक्त पतीकडून पत्नीवर दबाव, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:15 IST2025-03-20T11:15:13+5:302025-03-20T11:15:52+5:30
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

धर्मांतर केल्यावरच गर्भपाताला दिली परवानगी; विभक्त पतीकडून पत्नीवर दबाव, गुन्हा दाखल
नवी मुंबई : आंतरजातीय विवाहातून विभक्त झालेल्या पत्नीला गर्भपातासाठी अनुमती देण्यासाठी पतीने धर्मांतराची अट टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उलवे परिसरात राहणाऱ्या कुटुंबात हा प्रकार घडला. त्याठिकाणी राहणाऱ्या महिलेचा आंतरजातीय विवाह झाला असून सध्या ती पतीपासून वेगळी राहत आहे. दरम्यान, पतीने विभक्त होण्यापूर्वी इच्छेविरोधात ठेवलेल्या संबंधातून ती गरोदर राहिली आहे. यामुळे तिने गर्भपाताचा प्रयत्न केला असता पतीने त्यावर आक्षेप घेतला आहे.
तर गर्भपाताला अनुमती देण्यासाठी तिला धर्मांतर करण्याची अट घातली. त्यास नकार दिल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची व तिच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने एनआरआय पोलिसांकडे तक्रार केली असून पतीसह सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.