बुडीत कर्नाळा बँकेच्या प्रलंबित ठेवीदारांना ६३ लाखांचा परतावा ;पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश
By वैभव गायकर | Published: June 12, 2024 05:09 PM2024-06-12T17:09:40+5:302024-06-12T17:11:39+5:30
केव्हायसी आणि काही तांत्रिक अडचणीच्या शर्यतीत अडकलेल्या पाच लाखांआतील ठेवीदारांना अखेर त्यांच्या परताव्याची रोकड प्राप्त झाली आहे.
वैभव गायकर ,पनवेल: केव्हायसी आणि काही तांत्रिक अडचणीच्या शर्यतीत अडकलेल्या पाच लाखांआतील ठेवीदारांना अखेर त्यांच्या परताव्याची रोकड प्राप्त झाली आहे. बुडीत कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या २३७ ठेवीदारांना ६३ लाखांची रक्कम वितरित कारण्यात आली आहे. यामुळे पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी याबाबत आरबीआयसह कर्नाळा बँक अवसायकासह बँक ऑफ बडोद्यासह सर्व पातळीवर पत्रव्यवहार केला.याबाबत खारघर येथील भूषण तोडेकर यांनी कडू यांच्याकडे कैफियत मांडल्याने २३७ ठेवीदारांच्या ६३ कोटी रुपयांचा प्रश्न ऐरणीवर आला . कांतीलाल कडू यांनी बँक ऑफ बडोदाच्या ताडदेव शाखेशी पत्रव्यवहार करून त्या ठेवी परत मिळवून देणार असल्याचे घोषित करताच केव्हायसी आणि इतर तांत्रिक अडचणीत अडकलेल्या २३६ ठेवीदारांची वाढ झाली. ती रक्कम वाढून एक कोटी सत्तावीस लाखांवर गेली आहे. अद्याप इतर ठेवीदारांच्या ठेवी एक दिवसा आड त्यांच्या बँक खात्यात परस्पर जमा होत आहेत.
याशिवाय बँकेत पाच लाखांआतील अडकलेले ठेवीदार दररोज चार ते पाच जण पुढे येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी प्रविण म्हात्रे यांनी दिली आहे. पनवेल संघर्ष समितीच्या मोहिमेला यश येत असून पाच लाखांवरील ठेवीदारांचा लढाही अंतिम टप्यात असल्याचे कडू यांनी सांगितले आहे.