कचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:21 AM2018-11-15T03:21:41+5:302018-11-15T03:22:22+5:30

शहरात घनकचऱ्याची समस्या कायम : घंटागाडीचा मार्ग अद्याप ठरलेला नाही

The absence of planning in waste management, the way to the garbage | कचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना

कचरा व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव, घंटागाडीचा मार्ग ठरेना

Next

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पनवेल महानगरपालिकेने कचरा उचलण्याची सेवा हाती घेतली आहे. याकरिता नवीन घंटागाड्यांसह इतर यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत, परंतु यात सूक्ष्म नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. तसेच घंटागाड्यांचे मार्गही अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात अनेक अडचणी जाणवत आहेत.

पनवेल महापालिकेने कोणतीही तयारी नसताना कचरा व्यवस्थापनाची आव्हानात्मक सेवा हस्तांतरित करून घेतली. त्यासाठी सिडकोने गेल्या दोन वर्षांपासून तगादा लावला होता. नोड कचरामुक्त करण्यास सिडकोला यश मिळाले नाही. मात्र पुढील वर्षात आपले संपूर्ण कार्यक्षेत्र कचरामुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. त्या अनुषंगाने दैनंदिन कचरा व्यवस्थापनासाठी साई गणेश इंटरप्रायझेस या खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा संकलन करून वाहतूक करण्याची जबाबदारी या ठेकेदारावर सोपविण्यात आली आहे. त्याबदल्यात संबंधित ठेकेदार कंपनीला प्रत्येक टन कचºयास ७७७ रुपये अदा केले जाणार आहेत. या कामासाठी महापालिका वाहने पुरविणार आहे. त्यानुसार सध्या काही नवीन वाहने महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. येत्या काळात आणखी वाहने येणार आहेत.

विशेष म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरही या कामात अनेक अडचणी येताना दिसत आहेत. विशेष करून कळंबोली नोडमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. कधी कधी दोन दोन दिवस कचरा उचलला जात नसल्याने नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणच्या सार्वजनिक कुंड्या कचºयाने भरून वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत.

नियोजन आणि मार्ग ठरवा

च्या संदर्भात नगरसेवक सतीश पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन यशस्वी करायचे असेल तर याकरिता सूूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. घंटागाडी किती वाजता कोणत्या सोसायटीसमोर जावून कचरा संकलित करेल.
च्गाडी खराब झाल्यानंतर त्याला पर्याय व्यवस्था काय असेल. तसेच घंटागाडीचा मार्ग ठरविल्याशिवाय ते शक्य होणार नाही. असे झाले तर रहिवासी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाहीत. तसेच बीन्स भरून बाहेर कचरा वाहणार नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

कचरा उचलण्यासाठी नवीन घंटागाड्या महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने संबंधित संस्थेला सूचनाही करण्यात आल्या आहेत. लवकरच राहिलेल्या त्रुटी दूर करून कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरळीत केली जाईल.
-डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त महापालिका
 

Web Title: The absence of planning in waste management, the way to the garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.