नवी मुंबई : सानपाडामध्ये जलवाहिनी खोदण्याच्या ठेकेदाराने स्ट्रीट लाइटच्या खांबातून चोरून वीज घेतली आहे. बिनधास्तपणे हा प्रकार सुरू असूनही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. देशामध्ये सर्वत्र वीजबचतीसाठी प्रयत्न सुरू असताना नवी मुंबई महानगरपालिका विजेची उधळपट्टी करू लागली आहे. स्ट्रीट लाइटच्या खांबांमधून मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सानपाडा सेक्टर ६ मध्ये महापालिकेच्यावतीने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. रस्ता खोदण्यासाठी ड्रील मशीनचा वापर केला जात आहे. वास्तविक ठेकेदाराने यासाठी जनरेटरचा वापर केला पाहिजे. परंतु ठेकेदाराने स्ट्रीट लाइटच्या विद्युत डीपीमधून चोरून वीज घेतली आहे. जवळपास १०० मीटर लांब वायर टाकण्यात आली आहे. वायर अनेक ठिकाणी तुटली असल्याने पदपथावरून जाणाऱ्या नागरिकांना विजेचा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणच्या कार्यालयाच्या बाहेर वीजचोरी सुरू असतानाही संबंधित विभागानेही याकडे दुर्लक्ष केले. ही गोष्ट निदर्शनास आणून देताच कर्मचाऱ्यांनी जावून पाहणी केली. ठेकेदाराने वीजचोरी केली आहे, परंतु सदर डीपी बॉक्स महापालिकेचा असल्याचे सांगितले. वास्तविक कोणीही वीज चोरून वापरली किंवा दुसऱ्या व्यक्तीला दिली तर त्यावर महावितरण कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. परंतु स्वत:ची जबाबदारी महापालिकेवर ढकलून महावितरण कर्मचाऱ्यांनीही या वीजचोरीला अभय दिले. महापालिकेमध्ये विद्युत विभागाचे प्रमुख जी. व्ही. राव सक्तीच्या रजेवर आहेत. यामुळे विद्युत विभागाच्या कामावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. सानपाडामधील वीजचोरीकडे देखभाल दुरूस्तीचा ठेकेदार व पालिकेचे कर्मचारीही दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
पालिकेचे ठेकेदाराच्या वीजचोरीला अभय
By admin | Published: April 13, 2016 12:30 AM