नवी मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:25 AM2019-07-21T00:25:23+5:302019-07-21T00:25:40+5:30
नालेसफाई अर्धवटच। आराखडा पुस्तिकाही नाही। धोकादायक ठिकाणी फलकही नाहीत
नामदेव मोरे
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये यावर्षी आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. ४० ते ५० मि.मी. पाऊस पडला तरी शहरात पाणी साचू लागले आहे. जुलै महिना संपत आल्यानंतरही अद्याप आपत्ती आरखड्याच्या पुस्तकांची छपाई झालेली नाही. दरड कोसळणाऱ्या व इतर अपघातजन्य ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले नसल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
२६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये मुंबईसह राज्यभर मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. यानंतर शासनाने सर्वच महानगरपालिकांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनविणे बंधनकारक केले आहे. तब्बल १३ वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन उत्तमप्रकारे केले होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांची बैठक बोलावून आराखडा तयार केला जात होता. शहर आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देणारी दोन पुस्तके तयार केली जात होती. यामधील पहिल्या पुस्तकामध्ये महापालिकेची संपूर्ण माहिती. आपत्ती उद्भवणारी ठिकाणे व उपाययोजनांविषयी तपशील देण्यात येतो. आराखडा २ मध्ये महानगरपालिकेचे सर्व विभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सिडको, रेल्वे, महावितरणसह सर्व शासकीय कार्यालयांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क नंबर, मोबाइल नंबर देण्यात येतात. आपत्ती उद्भवल्यास नागरिकांच्या राहण्याची सोय कुठे केली जाणार याचा तपशीलही त्यामध्ये देण्यात येत असून, मदत
करणाºया संस्थांची व त्यांच्या पदाधिकाºयांची नावे त्या पुस्तकामध्ये दिली जात होती. ही पुस्तके सर्व नगरसेवक, महत्त्वाचे पदाधिकारी व महापालिकेच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध केली जात होती, यामुळे कोणतीही आपत्ती उद्भवली की संबंधित विभागाशी संपर्क साधणे शक्य होत होते.
या वर्षी जुलै महिना संपत आल्यानंतरही अद्याप आपत्ती आराखड्याच्या पुस्तकांची छपाई झालेली नाही. महानगरपालिकेने वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन मुख्यालयातील व विभागस्तरावरील आपत्तीनियंत्रण कक्षाचे संपर्क नंबर दिले आहेत; परंतु शहरातील आवश्यक त्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. पावसाळापूर्वी नालेसफाईची कामेही व्यवस्थित झालेली नाहीत, यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहरात तब्बल ३३ ठिकाणी पाणी साचले. ५० पेक्षा जास्त वृक्ष कोसळले, शॉर्टसर्किटच्या घटनाही रोज घडत आहेत. विजेचा धक्का बसून एकाला जीव गमवावा लागला आहे. बोनसरी झोपडपट्टीमधील नागरिकांनी धोक्याची सूचना दिल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे १५ घरांमध्ये पाणी शिरले. याच परिसरामध्ये पाच झोपड्या वाहून गेल्या. या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले; परंतु अद्याप कोणावरही कडक कारवाई झालेली नाही.
पुराचे पाणी भरण्याची शक्यता
प्रभाग ठिकाणे
बेलापूर १
वाशी, नेरुळ २
तुर्भे, दिघा ३
कोपरखैरणे १
घणसोली २
ऐरोली २
वाहतूक नियंत्रणाचा तपशील
विभाग संख्या
राष्ट्रीय महामार्ग ०१
महामार्गाची लांबी १५ किलोमीटर
नद्या, नाल्यांवरील पूल १४
एसटी व बस आगार ०९
जेटी ०२
रेल्वेस्टेशन ११
रेल्वे पुलांची संख्या १२