लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाशी रेल्वेस्टेशनसमोरील आयटी पार्कच्या भूखंडाचा दुरुपयोग सुरू आहे. आयटीव्यतिरिक्त व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. तेथील सर्व बांधकामांची चौकशी करण्यात यावी व नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे.सिडकोने वाशी रेल्वेस्टेशन इमारतीमध्येच आयटी पार्कसाठी कार्यालये उपलब्ध करून दिली होती. स्टेशनमधील आयटी सेंटरला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे स्टेशनसमोरील अनेक भूखंडही आयटी पार्कसाठी राखून ठेवण्यात आले होते. या भूखंडावर आयटी पार्क उभारण्यासाठी संबंधित विकासकांना दोन एफएसआय देण्यात आला होता. वाढीव एफएसआय घेऊन या परिसरामध्ये हायटेक इमारती उभारण्यात आल्या आहेत; परंतु प्रत्यक्षात या इमारतींमध्ये आयटी तंत्रज्ञानावर आधारित उद्योग सुरू करण्यात आलेले नाहीत. सर्व प्रकारचे व्यवसाय येथे सुरू करण्यात आले आहेत. महापालिका व शासनाकडून सवलती मिळवून त्याचा दुरुपयोग केला असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. यामुळे या परिसरातील आयटी पार्कसाठीच्या भूखंडाचा वापर योग्य होत आहे का? याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी स्थायी समिती सभागृहामध्ये या प्रश्नाकडे लक्ष वेधले. आयटी पार्क परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाला अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. आयटी पार्कच्या वाणिज्य वापराच्या मर्यादेत व्यवसाय बसत नसल्याचे कारण दिले जात आहे. वास्तविक या परिसरातील बहुतांशी आयटी पार्कमध्ये नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. महापालिका प्रशासन ठरावीक व्यक्तींची अडवणूक करत आहे. चुकीच्या पद्धतीने कामकाज केले जात आहे. सर्वच आयटी पार्कचे सर्वेक्षण करण्यात यावे व नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. यामुळे पुन्हा एकदा वाशीतील आयटी पार्कवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले असून, पालिका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाशीमध्ये आयटी पार्कच्या भूखंडाचा दुरुपयोग
By admin | Published: June 23, 2017 6:11 AM