खासगी गाड्यांवर महाराष्ट्र शासनाच्या पाटीचा गैरवापर, पोलिसांकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:58 AM2019-03-18T04:58:04+5:302019-03-18T04:58:51+5:30
कोणताही सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी असला तरी त्याला आपल्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावता येत नाही.
- मयूर तांबडे
पनवेल- कोणताही सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी असला तरी त्याला आपल्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावता येत नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन खात्याकडून जाहीर करण्यात आले असले, तरी पनवेल परिसरात हे नियम सर्रास पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी कर्मचारी आपल्या वाहनांवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावून बिनदिक्कतपणे फिरताना दिसत आहेत.
महामार्ग आणि इतरत्र होणाऱ्या पोलीस कारवायांपासून वाचण्यासाठी आणि टोलपासून सुटका होण्यासाठी वाहनांवर पोलीस, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, पत्रकार आदी पाट्या सर्रासपणे लावल्या जातात. आरटीओच्या नियमाप्रमाणे, खासगी वाहनांवर अशा प्रकारे नाव वापर करणे हा गुन्हा आहे. मात्र, तरीही अनेक सरकारी अधिकारी खासगी वाहनांवर अशा पाट्या लावत आहेत. याबाबत पोलिसांकडून विचारणा झाली असता, संबंधित गाडीमालक पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. त्यामुळे आरटीओने या प्रकरणी विशेष मोहीम काढून कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. गुरुवारी प्रादेशिक परिवहन विभाग, पनवेल यांच्याकडून गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावलेल्या वाहनावर कारवाई करण्यात आली. एमएच ०५ बीजे ३३८२ या क्र मांकांच्या वाहनावर दोन हजार रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.
पोलिसांनी खासगी वाहनांवर पोलीस असे लिहिण्यास कायद्याने बंदी आहे. अनेक पोलीस कर्मचारी या कायद्याचे उल्लंघन करून आपल्या गाड्यांवर पोलीस असे लिहिलेली पाटी लावतात. शिवाय विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खासगी गाड्यांवर महाराष्ट्र व केंद्र शासन असेही लिहिता येत नाही; पण त्यांच्याकडून नियमाचे उल्लंघन केले जात आहे.
शासकीय कामासाठी ज्या गाड्या भाडेतत्त्वावर शासनाने घेतल्या होत्या; पण आता त्यांचा करार संपला आहे, अशा गाड्यांच्याही दर्शनी भागावर अजूनही महाराष्ट्र शासन असे लिहिलेले असल्याचे समोर आले आहे. अनेक प्रशिक्षणार्थी वकील, डॉक्टर आपल्या दुचाकीवर अॅडव्होकेट स्टीकर व सिंबॉल काढतात; पण हे कायद्यानुसार नाही. परिणामी, अशा व्यक्तींनी नियमांची पायमल्ली केली तर कारवाई होणे गरजेचे आहे.
फॅन्सी नंबरप्लेट्स
गाडी क्र मांकाच्या पाटीवर क्र मांकाशिवाय दुसरे काही लिहिता येत नाही; पण या नियमाचे उल्लंघन करत शहरात फॅन्सी नंबरप्लेट्सच्या अनेक गाड्या धावत आहेत. काही नेत्यांनी तर दादा, भाऊ, अशा अक्षरात गाड्यांवर क्र मांक टाकले आहेत. हे नियमाच्या विरोधात आहे. याशिवाय भारताची राजमुद्रा, सैन्यातील विविध चिन्हांची प्रतिकृतीदेखील खासगी गाडीवर लावून त्याचा गैरवापर करण्यात येतो. यावर कारवाई करण्याची गरज आहे.
तोतया पत्रकारांचा कारवाईत अडथळा
सध्या प्रत्येक ठिकाणी तोतया पत्रकारांचा सुळसुळाट सुरू आहे. कोणत्या तरी साप्ताहिकाचा किंवा अस्तित्वात नसलेल्या वृत्तपत्राचे कार्ड तयार करायचे आणि आपल्या खासगी वाहनावर प्रेस असे बोर्ड लावून आपल्या कार्डची धमक दाखवत फिरायचे. मात्र, अशा प्रकारचे उद्योग तोतया पत्रकारांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशा तोतया पत्रकारांनी वाहनांवर प्रेस असे स्टीकर लावून हैदोस घातला आहे. तरी अशा तोतया पत्रकारांची सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्र शासन, पोलीस नावाची पाटी खासगी गाडीवर कोणीही लावू शकत नाही, अशा प्रकारे पाट्या लावणाºयांवर कारवाई करत आहोत.
- लक्ष्मण दराडे,
प्रादेशिक परिवहन
अधिकारी, पनवेल