एनएमएमटीच्या बंद असलेल्या थांबा शेडचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:56 AM2019-08-08T00:56:59+5:302019-08-08T00:57:11+5:30
प्रवाशांची गैरसोय; स्थलांतर करण्याची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात अंतर्गत एनएमएमटी बसचे मार्ग सुरू करताना प्रवाशांच्या निवाऱ्यासाठी बस थांब्यांवर शेड बसविण्यात आले होते; परंतु मार्गामध्ये बदल केल्यानंतरही शेड त्याच ठिकाणी असून नवीन थांबा करण्यात आलेल्या ठिकाणी शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून आवश्यक ठिकाणी शेड स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे.
नवी मुंबई शहरातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत बस सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार शहरात आणि शहराबाहेर एनएमएमटी बस फेऱ्यांचे जाळे पसरले आहे. नवीन मार्ग सुरू करताना प्रवाशांना निवारा देण्याच्या दृष्टीने बस थांबा असलेल्या ठिकाणी शेड उभारण्यात आले आहेत. बस मार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांची वर्दळ आणि मागणी यानुसार मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत; परंतु मार्गांमध्ये बदल केल्यावर शेड मात्र स्थलांतरित केलेले नाहीत त्यामुळे या शेडचा गैरवापर केला जात आहे. नेरु ळ सेक्टर १८, पामबीच मार्गावरील नेरु ळ आणि सानपाडामधील परिसर शहरातील अशा अनेक शेडमध्ये फेरीवाले व्यवसाय करीत असून वापरात नसलेले अनेक शेड गर्दुल्ले, मद्यपींसाठी आश्रयाचे ठिकाण बनले आहे.
तसेच मार्गात बदल झाल्यावर त्या ठिकाणी प्रवाशांना निवाºयाची आवश्यकता असतानाही शेड उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस मार्गात बदल झालेले आणि वापरात नसलेले निवारा शेड स्थलांतरित करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.