महागड्या तिकिटामुळे एसी लोकल रिकाम्या; प्रशासनाविरोधात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:20 AM2020-02-06T00:20:00+5:302020-02-06T00:20:30+5:30
ट्रान्स हार्बरवरील साध्या लोकलच्या फेऱ्या नियमित करण्याची मागणी
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एसी लोकलच्या महागड्या तिकिटामुळे प्रवाशांनी पाठ फिरवली असून, एसी लोकल रिकाम्याच धावत आहेत. या मार्गावर नियमित धावणाºया साध्या लोकलच्या सुमारे १६ फेऱ्या रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. साध्या लोकलच्या फेºया पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
रेल्वे प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ट्रान्स हार्बर मार्गावर ३० जानेवारीपासून एसी लोकल सुरू करण्यात आली. उद्घाटनानंतर प्रत्यक्षात एसी लोकलच्या फेऱ्या ३१ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या. पनवेल, नेरु ळ आणि वाशी या रेल्वे स्थानकांवरून ठाणे एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. साध्या लोकलने किमान अंतरावरील प्रवासासाठी पाच रु पयांचे तिकीट आकारले जाते. एसी लोकलने त्याच प्रवासासाठी सुमारे ७० रु पये तिकीटदर ठेवण्यात आला आहे.
ठाणे ते पनवेल मार्गासाठी १८५ रु पये तिकीटदर आकारले जात आहेत. एसी लोकलच्या प्रवासासाठी भरमसाठ तिकीटदर आकारले जात असल्याने, सर्वसामान्य प्रवाशांनी एसी लोकलच्या प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. एसी लोकल सेवा सुरू केल्यापासून या लोकलने सरासरी आठ ते दहा प्रवासी प्रवास करीत असून, इतर शेकडो सामान्य प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावरील सकाळी आणि सायंकाळी नियमित असलेल्या साध्या लोकलच्या फेºया बंद करून एसी लोकलच्या फेऱ्या सुरू केल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे स्थानकांवर साध्या लोकलसाठी प्रवाशांची गर्दी होत असून, साध्या लोकलच्या नियमित फेºया सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावर साध्या लोकलच्या वेळेत एसी लोकल चालवू नये, इतर वेळेत चालवाव्यात, अशी मागणी अनेक प्रवासी करीत आहेत. याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.
- सुदर्शन खुराणा, नेरु ळ रेल्वे स्थानक, प्रबंधक
रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावर साध्या लोकलच्या काही फेºया रद्द करून एसी लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. एसी लोकलचे तिकीटदर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. सामान्य प्रवाशांची गैरसोय होत असून, प्रशासनाने साध्या लोकलच्या वेळेत एसी लोकल चालवू नयेत.
- अजिंक्य पालकर, प्रवासी