सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACBची कारवाई; तीन लाख स्वीकारताना सापळा
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 16, 2023 06:49 PM2023-03-16T18:49:44+5:302023-03-16T18:50:54+5:30
सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACB ने कारवाई केली.
नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्ताला सिडकोकडून मिळणारा मोबदला निश्चित करण्यासाठी लाच मागणाऱ्या सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे. सात लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपये स्वीकारताना सिडको कार्यालयातच गुरुवारी हि कारवाई करण्यात आली.
मुकुंद बंडा (५७) असे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केलेल्या सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम झपाट्याने सुरु असून प्रकल्प बाधितांना सिडकोकडून भूखंड स्वरूपात मोबदला देण्याचे देखील काम सुरु आहे. त्यामध्ये एका प्रकल्पग्रस्ताला संपादित घराच्या बदल्यात मिळणाऱ्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी बंडा यांनी सात लाख रुपये मागितले होते. त्यापैकी तीन लाख रुपयांचा पहिला हप्ता गुरुवारी सिडको कार्यालयातच घेतला जाणार होता.
याबाबत संबंधित व्यक्तीने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार उपअधिक्षक ज्योती देशमुख यांच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून गुरुवारी दुपारी सिडको कार्यालयात सापळा रचला होता. त्यामध्ये बंडा यांनी तक्रारदार यांच्याकडून तीन लाख रुपये स्वीकारताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, हवालदार नितीन पवार, रतन गायकवाड, संतोष ताम्हणकर, योगेश नाईक, निखिल चौलकर यांच्या पथकाने सिडको भवन मधील बंडा यांच्या कार्यालयातच हि कारवाई केली.
या कारवाईवरून विमानतळ प्रकल्प बाधितांना मोबदला मिळवून देण्यात देखील सिडको अधिकाऱ्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक समोर आली आहे. तर बंडा यांच्याकडून स्वीकारली जाणारी रक्कम त्यांच्यापुरती मर्यादित होती कि त्यामध्ये इतरही कोणी सहभागी आहेत याचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंध विभाग करत आहे.