दोन वर्षांपासून रखडलेल्या आकृतिबंधाच्या मंजुरीला गती द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:16 AM2020-10-10T00:16:17+5:302020-10-10T00:16:28+5:30
पनवेल पालिकेचे उपमहापौर राज्यपालांच्या भेटीला; शासन आदेश द्याव
पनवेल : मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या आकृतिबंधाला शासकीय मंजुरीची गरज आहे. मागील दोन वर्षांपासून ही प्रक्रिया रखडली असल्याने पालिकेला अतिशय कमी मनुष्यबळावर आपला गाडा हाकावा लागत आहे.
अशा परिस्थितीत इतर कर्मचारी व अधिकारी वर्गावर याचा ताण पडत आहे. या आकृतिबंधाला लवकरात लवकर मंजुरी मिळण्याच्या दृष्टीने शासनाला आदेश देण्याबाबत पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत, संबंधित विषयात लक्ष घालण्याची मागणी केली.
पनवेल पालिकेचा २,००० पेक्षा जास्त पदांचा आकृतिबंध आहे. संबंधित आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यास पालिकेला पुरेसे मनुष्यबळ प्राप्त होईल, तसेच मनुष्यबळाच्या अभावी रखडलेली कामे मार्गी लागतील, याकरिताच लवकरात लवकर या आकृतिबंधाला मंजुरी मिळण्याची गरज असल्याने, गायकवाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांना विनंती केली. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी या संदर्भात शासकीय पातळीवर संबंधित नगरसचिवाना सूचना देण्याचे आश्वासन जगदीश गायकवाड यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी जगदीश गायकवाड यांच्यासोबत नगरसेविका विद्या गायकवाड, राजाराम पाटील, सुहास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.