नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प राष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्वाचा असून प्रकल्पाची कामे गतीने व वेळेत व्हावी अशा सुचना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर विजय सिंघल यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सर्वात प्रमुख प्रकल्प असल्यामुळे १ मार्चला प्रकल्पाच्या ठिकाणी जावून कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. आतापर्यंत झालेली कामे. सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती याची माहिती घेतली. देशासाठी हा प्रकल्प महत्वाचा असल्यामुळे त्याचे काम गतीने व वेळेत पूर्ण करावे अशा सुचना यावेळी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, गीता पिल्लई, शीला करूणाकरन, कॅप्टन बीव्हीजेके शर्मा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा राष्ट्रीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि नियोजित वेळेत व्हावी या उद्देशाने प्रकल्पाच्या भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्थळाला भेट दिली.-विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सिडको