बेलापूर किल्ला संवर्धनाच्या कामास गती; १७ कोटी खर्च होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 01:31 AM2020-01-01T01:31:31+5:302020-01-01T01:31:34+5:30
एकमेव ऐतिहासीक वारसास्थळाचे जतन; पामबीचवरील बुरूजाचीही दुरूस्ती
नवी मुंबई : शहरातील एकमेव ऐतीहासीक वारसास्थळ असणाऱ्या बेलापूर किल्ला संवर्धनाच्या कामास गती येऊ लागली आहे. बुरूजांची दुरूस्ती करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून यासाठी १७ कोटी रूपये खर्च केले जात आहेत.
नवी मुंबईमध्ये बेलापूर किल्ला हे एकमेव ऐतिहासीक ठिकाण आहे. १५६० ते १५७० मध्ये पोर्तुगीजांनी हा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर बेलापूरजवळील खाडीमध्ये हा किल्ला बांधला. कालांतराने हा प्रदेश सिद्दींनी जिंकला. १६८२ मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी पुन्हा जिंकला. १७३३ मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. १८१७ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याप्रमाणे येथील पुरातन वास्तुही नष्ट केल्या. नवी मुंबईची निर्मिती झाल्यानंतरही किल्ला दुर्लक्षीत राहीला होता. प्रसारमाध्यमांनी याविषयी आवाज उठविल्यानंतर व आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सिडकोने किल्ला संवर्धन करण्याविषयी सकारात्मक भुमीका घेण्यास सुरवात केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे विजयी झाल्यानंतर त्यांनी सिडकोकडे पुन्हा पाठपुरावा केला व अखेर १७ कोटी रूपये खर्च करून किल्ला संवर्धनाच्या कामाचे प्रत्यक्षात भुमीपूजन करण्यात आले.
बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सद्यस्थितीमध्ये सुरू केले आहे. किल्याच्या माथ्यावरील मुख्य बुरूज ढासळू लागला होता. त्या बुरूजाची दुरूस्ती करण्यास सुरूवात केली आहे. कोसळण्याच्या स्थितीत असलेले दगड बाजूला करून त्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. गडावरील पडलेल्या संरक्षण भिंतीचे कामही केले जात आहे. गडावरील जुन्या बांधकामांचे अवशेष असून त्यांचेही जतन केले जाणार आहे. गडावर घनदाट जंगल असून त्यामध्ये पर्यटकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था तयार केली जाणार आहे. मोकळ्या जागेवर उद्यान फुलविण्यात येणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून या ठिकाणाचा विकास होणार आहे.
येथे भेट देणाºया नागरिकांना गडाची ऐतिहासीक माहिती मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. पामबीच रोडवर किल्ला चौकामध्येही एक टेहळणी बुरूज आहे. या बुरूजाचीही दुरूस्ती करण्याचे काम सुरू झाले आहे. दोन वर्षामध्ये सर्व विकास कामे पूर्ण करून गडाचे संपूर्ण सुशोभीकरण केले जाणार आहे.
४५० वर्षांचा इतिहास
बेलापूर किल्ल्याला साडेचारशे वर्ष झाली आहेत. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली १७३३ मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला व तब्बल ८४ वर्ष तो स्वराज्यातच होता. त्यावेळी किल्ल्यावर प्रत्येकी १८० माणसांच्या ४ तुकड्या होत्या. २ ते ५ किलो वजनाच्या १४ बंदुका होत्या. ह्या किल्यावरून थेट घारापुरीपर्यंत बोगला होता अशी अख्यायिका असून त्याविषयी सद्यस्थितीमध्ये काही अवशेष दिसत नाहीत.