झेब्रा क्रॉसिंगचा रंग उडाल्याने अपघात
By admin | Published: November 14, 2016 04:32 AM2016-11-14T04:32:39+5:302016-11-14T04:32:39+5:30
पामबिच मार्गासह शहरातील मुख्य रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग अदृश्य झाले आहेत. यामुळे सिग्नल लागल्यानंतर नेमके थांबायचे कुठे याबाबत
नवी मुंबई : पामबिच मार्गासह शहरातील मुख्य रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग अदृश्य झाले आहेत. यामुळे सिग्नल लागल्यानंतर नेमके थांबायचे कुठे याबाबत चालकांमध्ये संभ्रम होत आहेत. परिणामी, अपघातांच्या घटना घडत असून चालकांचे वाहतूक पोलिसांसोबत वादाचे प्रकारही वाढत आहेत.
अपघात टाळण्यासाठी सर्वच चौक व ज्याठिकाणी पादचारी रस्ता ओलांडतात, अशा ठिकाणी सिग्नल कार्यरत आहेत. अशा सर्वच ठिकाणी सिग्नल लागल्यानंतर वाहनांना थांबण्यासाठी व पादचाऱ्यांना चालण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग तयार केले जातात. काही ठिकाणी केवळ पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून वाहनांना थांबण्यासाठी मर्यादा निश्चित करून दिली जात असते; परंतु सद्यस्थितीला शहरातील मुख्य तसेच विभाग अंतर्गतच्या रस्त्यांवरील हे पांढरे पट्टे तसेच झेब्रा क्रॉसिंग अदृश्य झाले आहेत. त्यांचा रंगच उडालेला असल्यामुळे अगदी दिवसाही हे पट्टे चालकांच्या नजरेस पडत नाहीत. त्यामध्ये पामबिच मार्गाचाही समावेश आहे. सिग्नलच्या ठिकाणचे पांढरे पट्टेच दिसेनासे झाल्यामुळे त्याठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी पामबिच मार्गावर एनआरआय येथे याच कारणामुळे एक अपघात झाला. त्यामध्ये एक महिला थोडक्यात मृत्यूच्या दाढेतून बचावली; परंतु दोन्ही अपघातग्रस्त वाहनचालकांनी पोलिसांसमक्ष एकमेकांविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगून प्रकरण मिटवले. मात्र, शहरात बहुतांश ठिकाणी रोज अशा प्रकारच्या घटना झेब्रा क्रॉसिंगचा रंग उडाल्याने घडत आहेत. त्याकडे पालिका व वाहतूक पोलीस या दोन्ही प्रशासनांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
रस्त्याचे दुभाजक तसेच झेब्रा क्रॉसिंगची रंगरंगोटी पालिकेमार्फत केली जाते. त्यानुसार रंग उडालेल्या झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी रंगकाम करण्याचे पालिकेला कळवले असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, पावसाळ्याच्या कारणावरून लांबणीवर गेलेल्या या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. परिणामी, सिग्नलच्या ठिकाणी वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. यामुळे वाहनचालक व वाहतूक पोलीस यांच्यात वादाचे प्रकारही घडत आहेत.
पांढरा पट्टा नसल्यामुळे सिग्नल लागल्यावर नेमके थांबायचे कुठे हे कळत नसल्याचे चालकांकडून पोलिसांना सांगितले जात आहे, तर नकळत अथवा जाणिवपूर्वक काहीसे पुढे येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. वाशीतील शिवाजी चौक व कोपरखैरणेतील रा. फ. नाईक चौकात याच कारणामुळे वाहतूककोंडीही होत आहे. त्याठिकाणी सिग्नल ओलांडून पुढे येऊन थांबणाऱ्या वाहनांना आवरताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत आहे. (प्रतिनिधी)