रस्त्यांवरील गैरसोयीमुळे घडताहेत अपघात

By admin | Published: March 25, 2016 12:58 AM2016-03-25T00:58:03+5:302016-03-25T00:58:03+5:30

रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा

Accident due to inconvenience on roads | रस्त्यांवरील गैरसोयीमुळे घडताहेत अपघात

रस्त्यांवरील गैरसोयीमुळे घडताहेत अपघात

Next

नवी मुंबई : रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश, अनावश्यक ठिकाणी स्पीडब्रेकर व कामातील त्रुटी यामुळे हे अपघात घडलेले आहेत.
रुंदीकरणाच्या कामानंतर सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक अधिकच गतिमान झालेली आहे. या मार्गावरून प्रतिदिन शेकडो छोटी-मोठी वाहने मुंबई, नवी मुंबई व पुण्याच्या दिशेने ये-जा करीत असतात. यावेळी सदर रस्त्यावर भेडसावणाऱ्या गैरसोयींमुळे अनेकांना अपघाताच्या घटनेशी सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी वाशी खाडीपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेला अज्ञात वाहनाने चिरडले होते. त्यानंतर रात्रभर या मृतदेहावरून छोटी-मोठी वाहने जात होती. त्यामुळे पूर्णपणे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेहाचे तुकडे पोलिसांना जमा करावे लागले होते. पुलावरील पथदिवे बंद असल्यामुळे वाहनाच्या जेमतेम प्रकाशातच चालकांना वाहने चालवावी लागतात. त्यामुळे अशाप्रकारच्या अनेक अपघातांची नोंद वाशी पोलिसांकडे होत आहे. शिवाय टोलनाक्यालगत पुलाच्या उताराला अनावश्यक ठिकाणी बसवलेला स्पीडब्रेकर व वाशी-सानपाडादरम्यानच्या पुलाच्या कामातील त्रुटी यामुळेही अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. १० दिवसांपूर्वी एका तरुणाला मोटारसायकल अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत. हा तरुण सानपाडा येथून मुंबईच्या दिशेने जात असताना पामबीच मार्गावरील पुलाच्या वाढीव कामातील त्रुटीचा तो बळी ठरला. पुलाच्या सुधारकामादरम्यान मार्गाचे दोन भाग जोडण्यासाठी लोखंडी रॉडचा वापर करण्यात आलेला आहे. मात्र रेल्वेच्या रुळाप्रमाणे असलेल्या या लोखंडावर मोटारसायकल येताच चाक घसरून अपघात होत आहेत.
अपघाताच्या या घटनांना आळा घालण्यासाठी सायन-पनवेल मार्गावरील त्रुटींमध्ये सुधार करून चालकांची गैरसोय दूर करण्याची गरज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यानुसार खाडीपुलावर पुरेशा प्रकाशाची सोय करून वाशी-सानपाडादरम्यानच्या पुलातील त्रुटी दूर करण्याची गरज वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

वाशी पोलीस ठाणे हद्दीत सायन-पनवेल मार्गावर दीड ते दोन कि.मी. अंतरात होणाऱ्या अशा अपघातांमध्ये प्रतिवर्षी सुमारे १२ जणांचे प्राण जात आहेत. सन २०१४ मध्ये एकूण ६४ अपघात घडले असून त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये ६८ अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Accident due to inconvenience on roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.