नवी मुंबई : एनएमएमटी आणि रिक्षाच्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले असून चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. खोपटा येथे हा अपघात घडला असून रिक्षातील कुटुंब एका नातेवाइकाच्या कार्याला जात असताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढावला. याप्रकणी उरण पोलिसांनी एनएमएमटी चालकाला अटक केली आहे.
एनएमएमटीची ३४ क्रमांकाची बस जुईनगरच्या दिशेने येत असताना बसने रिक्षाला धडक दिली. यामुळे रिक्षा पलटी होऊन त्यामधील चौघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये मुद्रा केदार मंत्री या ८ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई तेजश्री केदार मंत्री (३२), रिक्षाचालक आजोबा भालचंद्र म्हात्रे (५६) व आजी भावना म्हात्रे (५०) हे तिघे जण गंभीर जखमी आहे. त्यांना नेरुळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेजश्री मंत्री यांची प्रकृती चिंताजनक आहे.
तेजश्री या डोंबिवलीच्या राहणाऱ्या असून नागाव येथील वडील भालचंद्र म्हात्रे यांच्याकडे मुलीसह आल्या होत्या. त्यानुसार सोमवारी सकाळी सर्व जण त्यांच्याच रिक्षाने पेण येथील एका नातेवाइकाच्या कार्याला चालले असता हा अपघात झाला. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे.
बस वेगात असताना समोर रिक्षा आल्याने बसवरील ताबा सुटून हा अपघात घडल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार एनएमएमटी बस चालक हरुण पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले.