बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:20 AM2018-06-11T04:20:12+5:302018-06-11T04:20:12+5:30
ऐरोली येथील पटणीसमोरील मार्गावर अपघातामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
नवी मुंबई : ऐरोली येथील पटणीसमोरील मार्गावर अपघातामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. समोरून येणाऱ्या बसची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. ऐरोली कोळीवाडा येथे राहणारे दाम्पत्य विटावा तेथे राहणा-या मुलीच्या भेटीसाठी जात असताना त्यांच्यासोबत हा अपघात घडला.
ज्ञानेश्वर मढवी (५८) असे मयत व्यक्तीचे नाव असून ते ऐरोली कोळीवाडा येथील राहणारे आहेत. रविवारी दुपारी ते पत्नी मीना यांच्यासोबत विटावा येथे राहणाºया मुलीच्या भेटीसाठी चालले होते. यावेळी मढवी यांची मोटारसायकल (एमएच ४३ ए.एम. ४६९१) पटणी पार्कसमोरील मार्गावर आली असता अपघात झाला. त्याठिकाणी समोरून येणाºया खासगी बस व दुचाकीमध्ये जोराची धडक झाली. यामध्ये बस चालकाचा देखील ताबा सुटून बस रस्त्यालगतच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या कठड्याला धडकली. तर दुचाकीवरील ज्ञानेश्वर मढवी व त्यांची पत्नी मीना हे दोघेही बसच्या धडकेने गंभीर जखमी होवून जमिनीवर कोसळले होते. काही प्रत्यक्षदर्शींनी अपघाताची माहिती पोलिसांना देवून जखमी दाम्पत्याला कळवा येथील रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी ज्ञानेश्वर यांना मृत घोषित करण्यात आले. तर पत्नी मीना यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे बसच्या चालकाविषयी अधिक माहिती कळू शकलेली नाही.