दोन ठिकाणी एनएमएमटी बसला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:27 PM2019-09-23T23:27:52+5:302019-09-23T23:28:06+5:30
वाशीत दोन बसची धडक : पनवेलमध्ये ट्रकने धडक दिल्याने वाहतूककोंडी
नवी मुंबई : एनएमएमटी बसच्या अपघातांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सोमवारी वाशीमध्ये दोन बसचा अपघात झाला. पनवेलमध्ये ट्रकने समोर उभ्या असलेल्या बसला धडक दिली. यामुळे पनवेल प्रांत कार्यालयाजवळ वाहतूककोंडी झाली होती.
वाशी - तुर्भे मार्गावर सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. वाशीतून तुर्भेच्या दिशेने जाणारी बस शिक्षण महामंडळाच्या कार्यालयालगत आली असता ही दुर्घटना घडली. या वेळी समोर असलेली बस अचानक थांबली असता पाठीमागून आलेली एनएमएमटी तिला धडकली. सुदैवाने या वेळी बस कमी वेगात होती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र धडकेमुळे एनएमएमटीच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पनवेलमध्ये सोमवारी दुपारी १२च्या सुमारास एनएमएमटी (एमएच ४३,एच ५३८१) व ट्रक (एमएच ४६, एफ १००) या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. प्रांत कार्यालयासमोरील मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्याच ठिकाणी अपघात झाला. अपघाताने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या अपघाताने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनांना बाजूला करीत वाहतूककोंडी सोडविली. संबंधित घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पनवेल शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी असताना सर्रास अवजड वाहनांचा शिरकाव होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील बसच्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी उरणमध्ये बसमधील सीएनजीची गळती झाली होती. अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.