नवी मुंबई : पाम बीच रोडवर बुधवारी रात्री कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये एक ठार व दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये कारही जळून खाक झाली आहे.अपघातामध्ये अभिजीत इंद्रजीत याचा मृत्यू झाला असून, रोहित कोल व आशिष कटीयान हे दोघे जखमी झाले आहेत.
नवी मुंबईमधील सर्वाधिक अपघात होणाऱ्या रोडमध्ये पाम बीचचाही समावेश आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे किल्ले गावठाण ते वाशी दरम्यान वारंवार अपघात होत असतात. बुधवारी मध्यरात्री दीड वाजता अक्षर सिग्नलपासून पुढील वाशीकडे जाणाऱ्या रोडवर भीषण अपघात झाला. कार (एमएच ४६ बीक्यू २९४२)ने दुचाकी (एमएच ४३ टी ८३३७)ला मागून धडक दिली.
अपघातामुळे दुचाकीस्वार झाडीत फेकला गेला व दुचाकी जवळपास २०० मीटर पुढे फरफटत गेली. कारने रोडच्या बाजूला असलेल्या लोखंडी संरक्षण पट्ट्यांना धडक दिली, यामुळे कारला आग लागली. आगीमध्ये काही क्षणात कार जळून खाक झाली आहे. अपघातामध्ये दुचाकीवरील अभिजीत इंद्रजीत गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातामध्ये कारमधील रोहित कोल व आशिष कटीयान हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
कारला लागलेल्या आगीमध्ये ते भाजले आहेत. त्यांना वेळेत कारमधून बाहेर काढल्यामुळे त्यांना वाचविण्यात यश आले आहे. यामधील एकावर अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रोहित याला पहिल्यांदा डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व नंतर सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.वेगाने कार चालविणाºया चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. या प्रकरणी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात भीषण असल्यामुळे मध्यरात्रीही पाम बीच रोडवर अनेकांनी वाहने उभी केल्याने गर्दी झाली होती.
नागरिकांनी वाचविले दोघांचे प्राण
पाम बीच रोडवर झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलस्वार ठार झाला आहे. कारला लाग लागल्यामुळे आतमधील दोघेही गंभीर भाजले. प्रसंगावधान ओळखून या रोडवरून जाणाºया नागरिकांनी कारमधील दोघांना बाहेर काढले. यामुळे त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे. नागरिकांनी त्यांना कारमधून बाहेर काढले नसते तर कदाचित तेही कारमध्येच जळून खाक झाले असते.
झाडीतून शोधला देह
अपघातानंतर मोटारसायकलस्वार उडून रोडच्या बाजूच्या झाडीत पडला होता. वाहतूक व एनआरआय पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मोटारसायकलस्वाराचा शोध सुरू केला. जवळपास अर्ध्या तासाने तो झाडीत आढळून आला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले; परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.